देवी भराडी आमच्याशी सूडबुद्धीने वागणाऱ्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य दे !

नारायण राणेंचं आंगणेवाडीत साकडं ; दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबियांना देण्याचीही प्रार्थना

कुणाल मांजरेकर

मालवण : दीड दिवस चालणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी सहकुटुंब या जत्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, माझ्याशी राजकारणात सूडबुद्धीने वागणाऱ्या, मला अडचणीत आणायचा प्रयत्न करून द्वेषाची भावना ठेवणाऱ्यांना देवीने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो आणि राणे कुटुंबियांना या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद देवो, असे साकडे आपण देवीला घालत असल्याची प्रतिक्रिया ना. राणेंनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दुपारी आंगणेवाडी जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार शाम सावंत, रवी शेडगे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण पं. स. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, श्रीमती आसावरी राजोपाध्याय, अशोक सावंत, दीपक आंगणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने राणे कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, आतापर्यंत मी विविध क्षेत्रात जे यश संपादन केले आहे, त्यामध्ये आई भराडी देवीचा आशीर्वाद आहे, अशी माझी भावना आहे. म्हणूनच आमदार झाल्या पासून दरवर्षी मी न चुकता आंगणेवाडी देवीच्या जत्रेला येतो. देवीच्या आशीर्वादामुळे गेली ३५ वर्षे मी कोकणात कार्यरत असून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम माझ्या हातून होत आहे. मी केंद्रात लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळत असून देशातील ८० टक्के उद्योग या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. या मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणण्याची ग्वाही ना. राणे यांनी दिली. आजपर्यंत या जिल्ह्यासाठी, या भागासाठी मी काय काय केले हे मी सांगणार नाही, परंतु यापूर्वी हा जिल्हा कुठे होता आणि आता कुठे आहे याची तुलना प्रत्येकाने करावी, असेही नारायण राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!