सौ. शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळा च्यावतीने उद्या मालवणात महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा

विजेत्याला सोन्याच्या नारळासह मिळणार सोन्याची नाणी ; स्पर्धेदरम्यान महिला ढोलपथकाचे विशेष सादरीकरण

स्पर्धेला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण येथील सौ. शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने नवीन बंदर जेटी, मालवण येथे महिलांसाठी जिल्हास्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्या महिलेला सोन्याचा नारळ असलेला चषक, सोन्याची नाणी आणि पैठणी दिली जाणार आहे. या बक्षिसांचे अनावरण सौ. शिल्पा खोत यांच्या वतीने बुधवारी करण्यात आले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.

भव्य दिव्य स्वरूपात आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांवर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. अस्सल सोन्या चांदीचा नारळ विजेत्याला मिळणार असून सोबत सोन्याची तीन नाणीही विजेत्याला दिली जाणार आहेत. यासह मानाची पैठणी देऊन विजेत्या महिलेचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर उपविजेत्यास सोन्याची नथ व सोन्याचे नाणे तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांक यांना चांदीच्या वस्तू देऊन सन्मान होणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मालवणसह जिल्हास्तरावर सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान असणाऱ्या पाच महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाणार आहे. अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली.

कोंबडा, तात्याविंचू व कोळीनृत्य

स्पर्धे दरम्यान कोंबडा नृत्य व तात्या विंचू यांच्या पेहरावात विशेष कला सादरीकरण असणार आहे. तर कोळी नृत्येही सादर केली जाणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार, आमदार यांची उपस्थिती

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासह शासकीय अधिकारी व अन्य मान्यवरही निमंत्रित आहेत.

प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ

या स्पर्धेत प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. स्पर्धे दरम्यान चिठ्ठीद्वारे लकी प्रेक्षकाची निवड केली जाणार आहे. त्या लकी प्रेक्षकाला चांदीची वस्तू भेट दिली जाणार आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3843

Leave a Reply

error: Content is protected !!