वेंगुर्ल्यातील वडिलांच्या हत्येचे गूढ उकलले; दोन मुलगे ताब्यात!

दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली

रेडीच्या जंगलात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी

वेंगुर्ला : रेडी येथील जंगलमय परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या झालेल्या व्यक्तीचेच दोन मुलगे या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये एका सज्ञान तरुणासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वडिलांकडून दारूच्या नशेत वारंवार होणारा त्रास आणि मारहाण याला कंटाळून दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेडी येथील जंगलमय परिसरात १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत्यूच्या संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण, रेल्वेकडून मिळालेली माहिती तसेच स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

या तपासादरम्यान पोलिसांनी नजरे दाऊद आलम (वय ३१) आणि त्याच्या अल्पवयीन भावाला २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथील रेडकरवाडी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत वडील दारूच्या नशेत कुटुंबीयांना सतत त्रास देत तसेच मारहाण करीत असल्याने या त्रासाला कंटाळून दोघांनी मिळून त्यांची हत्या केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेडी येथील जंगलमय परिसरात नेऊन टाकल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सज्ञान आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने समन्वयाने काम केले. या यशस्वी तपासाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!