आपली संस्कृती आणि परंपरा युवकांनी अशीच जपावी : आमदार प्रमोद जठार
अलिबाग : गावदेवी मंदिर, रामनाथ, अलिबाग येथे कु. अजिंक्य शेवडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘नारळ फोडी स्पर्धा – भाजपा चषक २०२६’ या पारंपरिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे भाजपचेविधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनीही स्पर्धेला भेट देत स्वतः नारळ लढवून या आगळ्यावेगळ्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
नारळ लढविण्याच्या थरारक सामन्यांनी परिसरातील वातावरणात चांगलीच रंगत भरली होती. आमदार जठार यांनी स्वतः स्पर्धेत सहभाग घेतल्याने उपस्थित युवक आणि नागरिकांचा उत्साह आणखी वाढला. पारंपरिक खेळाला मिळालेला हा राजकीय नेतृत्वाचा उत्स्फूर्त सहभाग उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी “आपली संस्कृती, परंपरा आणि गावाकडील पारंपरिक खेळ युवकांनी जपले पाहिजेत. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या मातीतल्या परंपरांची ओळख होते,” असे सांगत आयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेच्या निमित्ताने आयोजक व कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. युवकांनी एकत्र येत आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नगरसेवक अंकित बांगेरा, तालुका अध्यक्ष रोशन भगत, अलिबाग युवा नेतृत्व अजिंक्य शेवडे, रितेश गुरव, निखिल चव्हाण, रोहन गुरव, सुनील दामले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.