महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर हस्तगत ; संशयित महिलेवर गुन्हा दाखल
मालवण :स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत मालवण तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील कुमामे गुरामवाडी येथे राहत्या घराच्या पाठीमागे शेडमध्ये लपवून ठेवलेली तब्बल १ लाख ८३ हजार रुपये किंमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू एलसीबीने जप्त केली आहे. या प्रकरणी सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) या महिलेवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी २८ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मालवण पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ८३ हजार १४५ रु. किमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बियर हस्तगत करण्यात आली आहे. संशयित आरोपीवर प्रोव्ही अधि. प्रति. कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु.नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सनील पाटील, हेड कॉ. बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार व स्वाती सावंत यांनी केलेली असून मालवण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.