… तर भाजपा जशासतसे उत्तर देईल ; अन्न सुरक्षा अधीक्षकांना इशारा

“त्या” जाचक अटी वरून उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर आक्रमक

कुणाल मांजरेकर

मालवण : अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या धाडसत्र मोहीमेवरून भाजपा उद्योग व्यापार आघाडीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ही धाडसत्र मोहीम सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिक्षक यांना निवेदन देऊन यासंबंधीचे नियम शिथील करून सर्वसामान्य व्यापाऱ्याला न्याय द्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी उद्योग-व्यापार आघाडी तर्फे करण्यात येणार आहे. विनंती करूनही व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नवीन अधिनियमानुसार अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत घेण्यात येणारा परवान्यासाठी व्यवसायाच्या जागेची कागदपत्रे मागितली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरेच व्यापारी हे जुने भाडेकरू तत्वावर व्यापार करत आहेत. अशा व्यापाऱ्यांकडे घरमालकाची लिखित परवानगी घेऊन आल्याशिवाय परवाना दिला जाणार नाही, असे सांगून परवाना दिला जात नाही. यामुळे बरेच व्यापारी परवान्या पासून वंचित राहणार आहेत. जुन्या नियमानुसार व्यापाऱ्याने स्व हमीपत्र दिले की परवाना मिळत असे. स्व हमीपत्र चालत नसल्याने मूळ मालकाचे संमतीपत्र आणणे काही व्यापाऱ्यांना जिकिरीचे आहे. काही व्यापाऱ्यांची न्यायालयीन लढत सुरू असून त्याचा निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत मालकाची संमती आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे या नियमात शिथिलता आणण्याची मागणी श्री. केनवडेकर यांनी केली आहे.

कोकणी मालाचे उत्पादक, मसाल्याचे उत्पादक यांना लघु, सूक्ष्म उद्योगाची नोंदणी कशी करावी व त्याचा फायदा उद्योगासाठी कसा करून घ्यावा, याचे मार्गदर्शन शिबिर भाजपातर्फे लवकरच आयोजित करण्यात येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी खादी ग्रामोद्योग तर्फे कर्ज पुरवठा घेतला आहे व त्याची सबसिडी येणे बाकी आहे, अशा व्यावसायिकांना सबसिडी मिळण्यासाठी केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करून ही सबसिडी मिळवून देण्यात येणार आहे, असेही विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!