रात्री साडेअकराच्या सुमारास दुर्घटना; पोलिसांकडून तपास सुरू
मालवण : मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय १०) यांचा मृत्यू झाला. तर सचिन अंकुश निकम हे जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्रो. डीवायएसपी शेलार, एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, कॉ. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.