
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान
सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात आला. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते महाविद्यालयाला प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग झोनसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने आणि उत्स्फूर्त सहभागाने हा महोत्सव संस्मरणीय ठरला. महोत्सवाच्या प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी यामुळे आयोजनाला विशेष दाद मिळाली.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाची मुंबई विद्यापीठाने विशेष दखल घेतली. विद्यापीठस्तरीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाच्या कार्यक्षम आयोजनावर शिक्कामोर्तब झाले.
मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभ व ५९व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. यावेळी बोमन इराणी यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी प्रशंसापत्र स्वीकारले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे बळ
युवा महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. अशा महत्त्वपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याचा बहुमान मिळणे आणि त्याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून प्रशंसापत्र मिळणे ही महाविद्यालयाच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
या गौरवामुळे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.






Subscribe to my channel






