रामेश्वर – नारायणाच्या पालखी सोहळ्याला उसळला भाविकांचा जनसागर !
थोड्याच वेळात बाजारपेठेतील रामेश्वर मांडावर पालखीचे होणार आगमन
मालवण : अखंड मालवण वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला बुधवारी दुपार पासून प्रारंभ झाला आहे. दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरातून ग्रामदेवतांच्या पालखी परिक्रमेला सुरुवात झाली. मार्गात ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून देवस्वारीचे स्वागत होत असून रामेश्वर नारायण येती दारा… तोचि दिवाळी दसरा…. असे भक्तिमय वातावरण मालवण शहरात निर्माण झाले आहे.
वायरी भूतनाथ येथे श्री भूतनाथ मंदिरात भेट दिल्यावर रामेश्वर नारायणची पालखी वायरी समुद्रकिनारी मार्गे मोरयाचा धोंडा या तीर्थस्थळाकडे रवाना झाली. या पालखी सोहळ्यात बहुसंख्य भाविक सहभागी झाले असून पालखीच्या निमित्ताने मालवण नगरीत चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण परसले आहे. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी सोहळा आज बुधवारी साजरा होत आहे. दुपारी १ वाजता देव रामेश्वर मंदिर येथून पालखी निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून दुपारी पालखीतून मार्गस्थ झाले. आडवण, तानाजी नाका येथून वायरी भूतनाथ येथे भूतनाथ मंदिराला दोन्ही भेट दिली. त्यानंतर वायरी समुद्री मार्गे मोरयाचा धोंडा येथे पालखी रवाना झाली. त्यानंतर दांडेश्वर मंदिर, मेढा येथे श्री देवी काळबा देवी मंदिर, जोशीवाडा येथील मांड व त्यानंतर बाजारपेठेत रामेश्वर मांड येथे पालखी भेट देणार आहे. त्यानंतर बाजारपेठ मार्गे भरड येथून पालखी रात्री उशिरा पुन्हा रामेश्वर मंदिरात विसर्जित होणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि मालवण व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. गेले काही दिवस मालवणात पावसाने धुमाकूळ घातला असताना आज मात्र पालखी सोहळ्यावर पावसाचे कोणतेही सावट नाही. तसेच दोन वर्षे कोरोना महामारीच्या कालावधीनंतर प्रथमच हा पालखी सोहळा निर्बंधमुक्त साजरा होत असून सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.