Sindhudurg | एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचं नुकसान…

आमदार निलेश राणेंकडून चिंता व्यक्त ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

महायुती सरकारकडून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळण्याचा विश्वास व्यक्त

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून दोडामार्ग सारख्या भागात हत्ती कडून शेतीचे नुकसान सुरु आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असून महायुती सरकारकडून अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत आपल्या एक्स पोस्ट मध्ये आ. राणे यांनी म्हटले आहे की, कोकणामध्ये पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. भात पीक कुजून गेलं, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला, काही ठिकाणी धानाची पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आम्ही अधिकृतपणे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही व्यथा कळवणार आहे. भेटीसाठी वेळ ही मागणार आहे कारण कोकणातल्या शेतीबद्दल आणि झालेल्या नुकसानी बद्दल जास्त काही मीडियावर येत नाही. पण आमचा सरकारवर विश्वास आहे की या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!