विकास कामांची माहिती घेवून ‘तुतारी’ सिंधुदुर्गात
महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक तुतारी एक्सप्रेसवर
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकात आगमन करणारी तुतारी एक्सप्रेस आज प्रवाशांसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक घेऊन दाखल झाली. दोन वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती ‘तुतारी’च्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रेल्वेच्या डब्यांचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. कोल्हापूर-गोंदिया या सारख्या लांब पल्ल्यांच्या पाच एक्सप्रेस गाड्यांव्दारे ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्यास कोरोना काळात देण्यात आलेले प्राधान्य, शेती, क्रीडा, सामाजिक या क्षेत्राबरोबरच कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग विमानतळ, उद्योग, पर्यटन, सागर संपत्ती, चक्रीवादाळ बाधीत मच्छिमारांना २८ कोटी रुपयांची मदत, चक्रीवादळ बाधीत फळबागांसाठी पुनःलागवड व पुनःरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात यासह वेगवेगळ्या आघाडीवर झालेली प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते १ मार्च या महिन्याभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.