
“मंत्री नितेश राणे आगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” घोषणांनी कुणकेश्वर दुमदुमले
देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेल प्रकल्पासाठी करार झाल्यानंतर कुणकेश्वरवासीयांनी आनंद व्यक्त करत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत “मंत्री नितेश राणे आगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा देत निर्णयाचे स्वागत केले.
कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. या प्रकल्पामुळे कुणकेश्वरचे नाव पर्यटनाच्या नकाशावर आणखी ठळकपणे अधोरेखित होईल, असा विश्वास ताम्हणकर यांनी व्यक्त केला. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्यासह गणेश चव्हाण, दिलीप चव्हाण, प्रवीण चव्हाण, श्रीकृष्ण बोंडाळे, चंद्रकांत घाडी, सुभाष तेली, सतीश तेली, मनोज आंबेरकर, राजीव बोंडाळे, प्रमोद चव्हाण आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकारातून कुणकेश्वरच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना चालना दिली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेल प्रकल्पासाठी झालेला करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पर्यटनाला नवी झळाळी, रोजगाराच्या संधींना चालना
‘ट्री ऑफ लाईफ’च्या या आलिशान हॉटेलमुळे कुणकेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, खाद्यपदार्थ, हस्तकला तसेच अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह कुणकेश्वर आणि परिसरातील पर्यटन अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कुणकेश्वर परिसरात अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत, स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि या भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी कुणकेश्वरवासीय, कुणकेश्वर भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही कुणकेश्वरमध्ये अशाच प्रकारचे पर्यटनविषयक प्रकल्प आणून परिसराच्या विकासाला अधिक गती द्यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ताज हॉटेल प्रकल्पाच्या निमित्ताने कुणकेश्वरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असून, आगामी काळात हे धार्मिक आणि पर्यटनस्थळ पर्यटनाच्या नकाशावर आणखी ठळकपणे झळकणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.






Subscribe to my channel






