१४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
सावंतवाडी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशासह तिने विभागीय स्पर्धेत धडक मारली आहे.
मल्लखांब या ताकद, संतुलन, लवचिकता आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात आस्थाने आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर तिने जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली.
आस्थाच्या या यशामुळे यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळ, कमांडंट लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा आणि प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. आस्थाच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी झळाळी मिळाली असून, विभागीय स्पर्धेतही ती अशीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.