

देवबाग मधील घटना ; पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल
मालवण : देवबाग येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात मोहन श्रीराम कुबल (रा. भानजीवाडी, देवबाग) यांना दुखापत झाली असून याबाबत मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीतर्फे गावातील रस्त्याच्या कामावर देखरेखीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेला टाकलेली माती काढण्यावरून रमेश पांडुरंग कद्रेकर यांच्याशी झालेल्या वादात ज्ञानेश्वर कद्रेकर, रमेश कद्रेकर व गणेश पेडणेकर यांनी आपणास लाकडी दांड्याने मारहाण केल्याने उजव्या कानास दुखापत झाल्याचे मोहन कुबल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मोहन कुबल यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कुबल यांच्या तक्रारीनुसार मालवण पोलीसांनी रमेश कद्रेकर, ज्ञानेश्वर कद्रेकर, गणेश पेडणेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार ११८- १, १३१, ३(५) कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर या प्रकरणी रमेश कद्रेकर यांनीही मोहन कुबल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरण कामावेळी रस्त्यावरील खडी व माती काढून रस्त्यालगत टाकलेली असताना सध्या सुरु असलेल्या रस्ता कामावेळी रस्त्याच्या कडेला असलेली माती हटवावी असे आपण रस्ता कामाच्या सुपरवायझरला सांगत असताना मोहन कुबल यांनी त्याठिकाणी येत आपल्या तोंडावर मारले तसेच आपल्यावर कोयता उगारला, असे कद्रेकर यांनी म्हटले आहे. याबाबत मालवण पोलीस तपास करत आहेत.



Subscribe to my channel




