भल्या पहाटे मालवण बाजारपेठेत आगीचे तांडव ; सुदैवानेच मोठा अनर्थ टळला

कीटकनाशकांच्या दुकानाला आग ; आठ लाखांची हानी !

पालिकेचे फायर बॉलच कामी आले ; मात्र फायर फायटरची गरजही निदर्शनास

कुणाल मांजरेकर

मालवण : येथील बाजारपेठेत विलास एजन्सीज या खते आणि कीटकनाशकांच्या दुकानाला आज भल्या पहाटे अचानक आग लागल्याने कीटक नाशके, खते व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत आपल्या दुकानाची झाडलोट करीत असलेल्या युवा दुकानदारांच्या ही आग नजरेस पडल्यानंतर त्यांनी धावाधाव करून बाजारपेठतील नागरिकांना आणि नगरपालिकेला माहिती दिल्याने सुमारे दीड दोन तासाने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मालवण सोमवारपेठ येथील हनुमान मंदिर समोर विलास हरमलकर यांचे विलास एजन्सीजचे खत, कीटकनाशके विक्रीचे दुकान आहे. काल रात्री श्री हरमलकर हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले होते आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास विलास एजन्सीज या दुकानाला आग लागली दुकानातून येणाऱ्या मोठ मोठ्या ज्वाळानी आकाश व्यापून जात असल्याचे चित्र विलास एजन्सीज पासून जवळच असलेल्या सोमवारपेठ येथील गुरुमाऊली या कपड्याच्या दुकानात साफसफाई करणाऱ्या राजेश मुंबरकर तसेच शुभम अंधारी आणि त्याच्या इतर मित्र मंडळींना दिसताच त्यांनी धावाधाव करीत नगरपालिकेला तसेच नागरिकांना आणि दुकानाचे मालक विलास हरमलकर यांना आगीची माहिती दिली. यावेळी नागरिकांनी विहिरीला पंप लावून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी नगरपालिकेचे मुकादम श्री वळंजू यांनी नगरपालिकेतून फायर बॉल आणून आगीच्या ठिकाणी मारा सुरू केला. यावेळी राजेश मुंबरकर, शुभम अंधारी, अमेय देसाई, स्वप्नील अंधारी व इतर तरुणांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी अमेय देसाई, फारुख ताजर, दुकान मालक विलास हरमलकर, विनायक सापळे, रणजित पारकर, रमेश पारकर , रंजन मुंबरकर, दिनेश मुंबरकर, समीर कदम, भूषण मुंबरकर, शेखर अंधारी, दुर्गेश परब, आदित्य देसाई, आकाश खोत, हरेश मुंबरकर, सरदार ताजर, मुकादम आनंद वळंजू, कोकरे यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, नितीन तायशेटे व इतर नागरिकांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

मोठा अनर्थ टळला !

मालवण बाजारपेठ ही दाटीवाटीने वसलेली आहे. येथील बहुतेक सर्वच दुकाने एकमेकांना लागून आहेत. रविवारी पहाटे विलास हरमलकर यांच्या दुकानाला आग लागली. सुदैवाने ही घटना स्थानिक तरुणांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने धावाधाव करून आग नियंत्रणात आणण्यात मोठी भूमिका निभावली. दिवाळीच्या साफसफाई निमित्ताने हे युवा व्यापारी आपापल्या दुकानात होते. म्हणून त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळेच मोठा अनर्थ टळला.

फायर बॉलच कामी आले ; मात्र फायर फायटरची गरज

हरमलकर यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच नगरपालिकेचे मुकादम श्री. वळंजू आणि त्यांचा मुलगा विरेश वळंजू यानी धावाधाव करीत नगरपालिकेतून फायर बॉल आणून ते भडकलेल्या आगीवर फेकले. आग विझविण्यासाठी आठ फायर बॉलचा वापर केला गेला. त्यामुळे बऱ्याच अंशी आग आटोक्यात आली. दरम्यान, पालिकेने अत्यावश्यक वेळेसाठी आणलेले हे फायरबॉल आज कामी आले असले तरी फायर फायटरची गरज देखील प्रामुख्याने समोर आली आहे. मालवण नगरपालिकेचा फायर फायटर राज्य शासनाकडून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही मंजुरी तातडीने उपलब्ध होण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आग विझवताना युवक जखमी

मालवण बाजारपेठेत आग लागल्याचे समजताच अनेकांनी आग विझवण्यासाठी येथे धाव घेतली. यावेळी आग विझवताना रणजित पारकर या युवा व्यापाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!