“आता पोस्टाचा विमा, आपल्या प्रभागात” ; आप्पा लुडबे यांचा अभिनव उपक्रम
मालवण शहरातील प्रभाग ९ मध्ये राबवला उपक्रम ; नागरिकांचे हेलपाटे थांबले
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय डाक विभागाने अवघ्या ३९९ रुपयांत दहा लाखाचा अपघात विमा आणला आहे. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पोस्ट ऑफिस मधील हेलपाटे थांबण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी “आता पोस्टाचा विमा, आपल्या प्रभागात” ही अभिनव संकल्पना आणली आहे. आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. ९ मध्ये या योजनेसाठी स्वतंत्र शिबिरे आयोजित केली जात असून तीन दिवसांत ८७ जणांनी या योजनेचा लाभ घेतला. या उपक्रमाचे नागरिकांतुन स्वागत करण्यात येत आहे.
आप्पा लुडबे यांच्या वतीने यापूर्वी नागरिकांसाठी ई श्रम कार्ड, आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अशी शिबिरे यापूर्वी घेण्यात आली आहेत. त्याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने फायदा घेतला. अलीकडे भारतीय डाक विभागाच्या वतीने १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ३९९ रुपयात दहा लाखाचा अपघात विमा पॉलिसी आणण्यात आली आहे. यामध्ये अपघाती मृत्यू १० लाख, कायमचे अपंगत्व १० लाख, दवाखान्याचा खर्च ६० हजार, मुलांचा शिक्षण खर्च १ लाख, ऍडमिट असेपर्यंत दहा दिवसांसाठी दररोज १ हजार, ओपीडी खर्च ३० हजार, अपघाताने पॅरालिसिस झाल्यास १० लाख तर कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च २५ हजार पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी होत आहे.
त्यामुळे प्रभागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये खास शिबिरांचे आयोजन केले आहे. आजवर तीन ठिकाणी ही शिबिरे झाली आहेत. वायरी येथे आयोजित केलेल्या शिबिरात २४ जणांनी लाभ घेतला. यावेळी पोस्ट कर्मचारी सिद्धेश फटकुरे यांच्यासह बाळू मेस्त्री, भाई लुडबे, संजय पाताडे, हेमंत मिठबावकर, प्रभाकर लुडबे, साईनाथ लुडबे, विशाल हेदळकर यांनी सहकार्य केले. तर आडवण येथे रोहित चव्हाण यांच्या घरी आयोजित केलेल्या शिबिरात सुहास चव्हाण, विनय हिंदळेकर, संजय वराडकर, उदय वालावलकर, भाई गोवेकर, भूषण माडये, रवी चव्हाण, किशोर पाटकर यांनी सहकार्य केले. याठिकाणी ३४ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. भरडेवाडा येथे रामू डिचोलकर यांच्या घरी आयोजित केलेल्या शिबिरात अतुल हडकर, नथी हिंदळेकर, योगेश गवंडी, गोविंद गावकर, गिरीश गावकर, आनंद गावकर,संतोष नार्वेकर यांनी सहकार्य केले. याठिकाणी २९ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरांसाठी पोस्ट कर्मचारी सिद्धेश फटकुरे, एकनाथ गावडे, अक्षय इजापवार आणि स्वप्नील जाधव यांनी सहकार्य केले.
४,५ ऑगस्टला देऊळवाडा, वायरी मुस्लिम मोहल्ला येथे शिबीर
गुरुवारी ४ ऑगस्टला दुपारी २ ते ६ या वेळेत देऊळवाडा येथे प्रदीप चव्हाण यांच्या घरी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर शुक्रवारी ५ ऑगस्टला वायरी मुस्लिम मोहल्ला येथे हे शिबीर होणार आहे. तरी येथील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आप्पा लुडबे यांनी केले आहे.