
मालवण बंदर जेटीवर रंगला महाराष्ट्रातील मानाचा राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; २४ संघांचा सहभाग
मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला क्रीडा परंपरेची रंगत देत सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबागच्या शैलेश नाईक यांनी बाजी मारली. अंतिम सामन्यात पंकज सादये यांना नमवत नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावत १ लाख १ हजार १११ रुपये रोख आणि आकर्षक चषक आपल्या नावावर केला.
मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, गोवा आणि सिंधुदुर्गातून तब्बल २४ संघांनी सहभाग घेतल्याने मालवण बंदर जेटीवर दिवसभर नारळ लढतींचा थरार पाहायला मिळाला. दोन गटांत झालेल्या सामन्यांमध्ये तुल्यबळ संघांमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या लढतींनी उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांचा सतीश आचरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर यांच्यासह मान्यवरांचे मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. आमदार राणे यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना ही स्पर्धा दरवर्षी अधिक मोठ्या स्वरूपात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“राजकारणासाठी नव्हे, नारळ खेळाची हौस मोठी व्हावी म्हणून…” अशी भूमिका स्पष्ट करत सतीश आचरेकर यांनी सांगितले की, लहानपणापासून नारळ खेळण्याची आवड असून मित्रमंडळातील सर्वांना नारळी पौर्णिमेचा आनंद घेता यावा, या उद्देशातून या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. आज मालवणवासीयही या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आनंद आचरेकर, तुषार मसुरकर, नीलेश वेर्णेकर आणि मॉन्टी नार्वेकर यांचे मोलाचे योगदान राहिले.
द्वितीय क्रमांक आसिफ विकी यांनी पटकावत ५१ हजार १११ रुपये व चषक मिळविला. तृतीय क्रमांक पंकज सादये यांनी मिळवत २१ हजार १११ रुपये व चषक, तर मनोज मयेकर यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळवत ११ हजार १११ रुपये व चषक पटकावला.याशिवाय अलिबागचे वर्धान घरत यांना उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ, गोव्यातील डॉमनिक (पंकज सादये) यांना उत्कृष्ट प्रहार, तर खारेपाटणचे तुषार कोळसुलकर यांना आकर्षक नारळ पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्पर्धेचे समालोचन श्रावणी पाटील (सातारा) आणि अक्षय मालवणकर (मालवण) यांनी केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.






Subscribe to my channel






