मालवण पं. स. च्या नावलौकिकामुळे सुनील घाडीगांवकरांना पोटशूळ !

डबलबारी करायची असेल तर आम्हीही तयार ; सभागृहात आणि सभागृहा बाहेरही !

सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर यांचे प्रत्युत्तर

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीने विविधांगी उपक्रमामुळे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. सभापती, उपसभापती पदांमुळे आमचेही कौतुक होते, हे पाहून सुनील घाडीगांवकर यांना पोटशूळ उठला आहे. त्यांना डबलबारी करायचीच असेल तर आम्हीही तयार आहोत, सभागृहातही आणि सभागृहा बाहेरही, असे आव्हान सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी दिले आहे.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी घेण्यात आली. या सभेला १२ पैकी केवळ चार सदस्य उपस्थित राहिले. या पार्श्वभूमीवर गटनेते सुनील घाडीगावकर यांनी सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो अशी प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर सभापती, उपसभापतीनी गुरुवारी सुनील घाडीगावकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुनील घाडीगावकर यांनी आमच्यावर केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. अन्य सदस्यांच्या वैयक्तिक कारणास्तव गैरहजेरीचा गैरफायदा घेऊन स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न घाडीगावकर यांनी केला आहे. स्वतःच्या फायद्यावेळी आपण ठराविक पक्षाचे म्हणून सांगायचे आणि इतरवेळी सर्वपक्षीय म्हणून आव आणायचा, ही दुटप्पी भूमिका घाडीगावकर घेत आहेत. पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाचा पदभार आम्ही हातात घेतल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला आणि सभेला सर्व सदस्यांना आम्ही आदरपूर्वक सन्मान दिला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना देखील आम्ही समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून पंचायत समिती मध्ये कधीही पक्षीय राजकारण झाले नाही. असे असताना निव्वळ राजकीय आकसापोटी सुनील घाडीगावकर यांच्याकडून आरोप केले जात आहेत. पंचायत समितीच्या कारभाराबाबत इतर कोणाही सदस्यांना आक्षेप नसून केवळ सुनील घाडीगावकर यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे अजिंक्य पाताडे म्हणाले.

सुनील घाडीगावकर यांना केवळ आमच्या बाबतच आक्षेप आहे, असे नाही. तर मागील पाच वर्षात मासिक सभा सोडून अन्य कुठल्याही कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले नाहीत. याचे रेकॉर्डही आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही वेळोवेळी सर्वांना समान न्याय देऊन जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविले आहेत, असे असताना आमच्यावर खोटेनाटे आरोप सहन करणार नाही, असेही अजिंक्य पाताडे म्हणाले.

गटनेत्याने गट निर्माण करू नयेत : उपसभापती

सुनील घाडीगावकर हे पंचायत समितीचे गटनेते आहेत. त्यामुळे गटनेत्याने गट निर्माण करण्याचे काम करू नये. तर गड बांधण्याचे काम करावे, असा सल्ला उपसभापती राजू परुळेकर यांनी या निमित्ताने दिला आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!