धोंडू चिंदरकर : भाजपचे शिस्तबद्द, आक्रमक व सर्वसमावेशक नेतृत्व

भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष

२० जून १९७२ रोजी मुंबईत जन्मलेल्या धोंडू चिंदरकर यांनी चिंदर ही आपली कर्मभूमी बनवत श्री देवी माऊलीच्या आशीर्वादाने तत्कालीन शिवसेना नेते नारायणराव राणे, कै. विठ्ठल चव्हाण, कै. रमेश मोरे, गुरुनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १६ व्या वर्षी राजकारणात सक्रिय प्रवेश केला. शिवसेना ही त्याकाळी तरुणांची संघटना म्हणून ओळखली जात होती. हिंदुत्वाने पच्छाडलेले अनेक युवक शिवसेनेची ताकद होते. त्यातीलच एक असलेल्या धोंडू चिंदरकर यांची १९९२ साली शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तर १९९५ मध्ये चिंदर विकास संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांची निवड झाली. १९९० च्या दशकात श्री. चिंदरकर यांची धडाडी व आक्रमकपणा अनुभवता आला. २००० ते २००५ मध्ये चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच तर २००५ ते २००७ या कालावधीत चिंदर सरपंच म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे २००७ मध्ये त्यांना थेट पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर २०११ ला मालवण पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. राजकारणा बरोबरच विविध संस्थांवर त्यांनी काम केले आहे. यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्हा संघर्ष समिती सरचिटणीस, तंटामुक्ती अध्यक्ष अशा अनेक पदांचा मान त्यांना मिळाला.

आज धोंडू चिंदरकर हे नाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठं आहे. तरी देखील “मी”पणा त्यांनी कधीही स्वतःत येऊ दिला नाही. आचऱ्याचे माजी सरपंच राजन गावकर व कै हरिश्चंद्र हडकर यांनी आपणाला राजकारणात आणलं. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कै. अरविंद मांजरेकर, कै. अशोक लोके यांचं आपणाला मोलाचं सहकार्य लाभल्याचं ते आवर्जून सांगतात. आजही माजी जि. प. अध्यक्षा सरोज परब, शर्वरी पाटकर, अशोक सावंत हे नेहमीच माझ्या पाठीशी राहिले असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत ही सगळी मंडळी तेवढ्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभी असतात. तर विलास हडकर हे मार्गदर्शक म्हणून आजही तेवढेच सहकार्य करत असून संघटनामक कामात महेश मांजरेकर, विजय निकम बऱ्यापैकी हातभार लावतात. अनेक सहकारी यांच्यामुळे मी राजकारणात तग धरून आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तळागाळातील संपर्क, ग्रामीण भागात पकड हे त्यांचे स्वभाव गुण असून चिंदर सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रचार करण्यासाठी ते स्वतः मालवण तालुक्यातील विविध पंचायत समिती गणांमध्ये जाऊन बैठका घेतात. खा.नारायण राणे, रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जुन्या अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचे काम ते करत असून वरिष्ठ नेत्यांच्या सूचना स्थानिक पातळीवर शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचे काम चोखपणे करतात.

धोंडू चिंदरकर यांची कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध, आक्रमक आणि सर्वसमावेशक मानली जाते. मालवण तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी ते प्रामुख्याने थेट लोकसंपर्क आणि गतिशीलता दाखवत असून केवळ कार्यालयात बसून न राहता स्वतः मालवण तालुक्यातील गावागावांत, वाड्यांवर आणि बूथ स्तरावर जाऊन थेट लोकांशी संवाद साधतात. जनतेचे प्रश्न सोडवणे: स्थानिक लोकांच्या समस्या, रस्ते, पाणी, आणि शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी ते स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतात. नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य मानसन्मान देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे.

खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक राजकीय शैलीला पूरक अशीच भूमिका धोंडू चिंदरकर स्थानिक पातळीवर घेतात. विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देणे आणि आपल्या भाजपा पक्षाचे वर्चस्व राखणे ही त्यांच्या कामाची मुख्य पद्धत आहे. यासाठी वेळप्रसंगी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेण्याची तयारी त्यांनी अनेकदा दाखवली आहे. भाजप सारख्या एका राष्ट्रीय पक्षाचा सलग तीनवेळा बिनविरोध अध्यक्ष होणे, ही राजकारणातील दुर्मिळ बाब मानली जात असून वाढदिवसाचे औचित्य साधून यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करण्यासाठी कोकण मिरर परिवाराच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा!!!

error: Content is protected !!