वडाचे झाड अंगावर पडून प्रतीक वाळके यांचा मृत्यू; कुटुंबीयांची वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी घेतली भेट

कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगतचे वडाचे झाड अंगावर पडून दुचाकीस्वार प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी असलदे येथे वाळके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगतची अनेक झाडे तोडण्यात आली होती. मात्र असलदे येथील जुने व धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जाणारे वडाचे झाड कायम राहिले. १५ सप्टेंबर रोजी प्रतीक वाळके हे दुचाकीवरून या मार्गाने जात असताना अचानक हे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. या दुर्घटनेत प्रतीक यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांबाबत काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच संबंधित यंत्रणा व ठेकेदाराकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, वैभव नाईक आणि सुशांत नाईक यांनी वाळके कुटुंबीयांची भेट घेऊन प्रतीक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी तात्या निकम, सचिन लोके, अनिल नरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!