शिवसेना पुरस्कृत अपक्ष अक्षता गावडेंकडून ‘वायरी भूतनाथ’चा गड काबीज ; उबाठाचे मनसुबे धुळीस

वायरी भूतनाथ पं. स. मध्ये भाजपचे घन:श्याम झाड तर कुंभारमाठ पं. स. मध्ये शिवसेनेच्या मानसी भोगावकर विजयी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना पुरस्कृत सौ. अक्षता राजन गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. याठिकाणी शिवसेनेने ऐन वेळी उमेदवार बदलून माजी तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या पत्नीला पाठींबा दिल्याने अंतर्गत नाराजीचा फायदा आपल्याला मिळू शकेल असा कयास ठाकरे शिवसेनेने बांधला होता. मात्र सौ. अक्षता गावडे यांनी मोठा विजय मिळवत उबाठाचे मनसुबे पार धुळीला मिळवले आहेत. सौ. गावडे यांना 4222 तर उबाठाच्या साक्षी लुडबे यांना 3041 मते मिळाली.

वायरी भूतनाथ जिल्हा परिषदेत शिवसेनेची निशाणी नसल्याने शिवसेना पुरस्कृत सौ. अक्षता गावडे यांनी नारळ निशाणीवर निवडणूक लढवली. ही जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. या लढतीत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजा गावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व उबाठाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर करीत होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदार संघ खेचून आणला आहे.

वायरी भूतनाथ पंचायत समिती गणात भाजपच्या घन:श्याम उर्फ श्यामा झाड यांनी 1765 मते मिळवत उबाठाच्या पास्कोल रोड्रिक्स (1569 मते) यांचा 196 मतांनी पराभव केला. याठिकाणी काँग्रेसने देवानंद लुडबे यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना 311 मते मिळाली. त्यामुळे श्यामा झाड यांच्या विजयाचे गणित सोपे झाले.

कुंभारमाठ पंचायत समिती मतदार संघात शिवसेनेच्या मानसी भोगावकर यांनी ठाकरे शिवसेनेच्या प्रणिता लंगोटे यांचा 1557 मतांनी पराभव केला. भोगावकर यांना 2534 तर लंगोटे यांना 1007 मते मिळाली.

error: Content is protected !!