
राधिका मोंडकरांनी अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये; नगरसेविका भाग्यश्री मयेकरांचा ठाकरे गटाला घणाघाती पलटवार
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागील कार्यकाळातील रखडलेल्या विकासकामांचा दाखला देत, “नाईकांच्या अपयशी कारभाराचा पाढा जनता कायम वाचत राहणार,” असा घणाघात त्यांनी केला.
ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांनी मांडलेली भूमिका ही वैभव नाईक यांच्या अपयशाचा फॅक्टर झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका मयेकर यांनी केली. “तुम्हालाही जनतेने निवडणुकीत नाकारले आहे, याचे थोडे तरी भान ठेवा,” असा टोला त्यांनी लगावला.
प्रसिद्धीपत्रकातून भाग्यश्री मयेकर म्हणाल्या की, माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात अनेक कामे रखडली. त्यामुळे त्यांच्या कारभारातील अपयशाचा उल्लेख होत राहणार असून तो कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या कामगिरीवर जनतेनेच निवडणुकीत शिक्कामोर्तब केले आहे. “नाईकांच्या काळात काही किरकोळ कामे झाली असतील, असे ठाकरे गटाला वाटत असेल, तर त्यांच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेल्या आणि रखडलेल्या कामांची जबाबदारीही त्यांनी स्वीकारावी,” असे आव्हान मयेकर यांनी दिले.
‘खोटे बोला, पण रेटून बोला’ हीच ठाकरे गटाची प्रवृत्ती!
राधिका मोंडकर यांच्यावर निशाणा साधताना मयेकर म्हणाल्या, “आपण नुकतेच पदावर आला आहात. कुठलीही शहानिशा न करता कुणीतरी लिहून दिलेला मजकूर प्रसिद्ध करून स्वतःचीच पाठ थोपटून घेऊ नका. राजकारणात वास्तव समजून घेणे महत्त्वाचे आहे.” मालवण-कुडाळच्या जनतेनेच वैभव नाईक यांना ‘माजी’ केले आहे. त्यामुळे जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याऐवजी अपयश झाकण्यासाठी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘मालवणच्या विकासासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध’
मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे स्पष्ट व्हिजन असून निधी खेचून आणण्याची धमक असल्याचा दावा भाग्यश्री मयेकर यांनी केला. “जनतेने मोठ्या विश्वासाने निलेश राणे यांना निवडून दिले. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणत त्यांनी मालवण शहराच्या विकासाला गती दिली आहे. रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम सुरू आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत वर्षभरात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम त्यांनी केले आहे. मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध आहेत,” असे मयेकर यांनी सांगितले.
मालवण नगरपरिषदेत माजी आमदारांचा अपेक्षित प्रभाव दिसला नाही. राजकीय वजन आणि पाठपुराव्याअभावी अनेक कामे प्रलंबित राहिली, असा दावा करत मयेकर यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘उपोषणाची नौटंकी नको; माजी आमदारांना जाब विचारा!’
“माजी आमदार वैभव नाईक यांच्या काळात प्रस्तावित मत्स्यालयाचा निधी परत का गेला? भुयारी गटार योजना ११ वर्षांत पूर्ण का झाली नाही? सफाई कामगार संकुल का रखडले? भाजी मार्केट अद्याप पूर्ण का झाले नाही? प्रस्तावित नळपाणी योजनेला मंजुरी मिळण्यासाठी सहा वर्षे का लागली?” असे सवाल मयेकर यांनी उपस्थित केले. “या प्रश्नांचा जाब आम्हाला विचारण्याऐवजी आपल्या माजी आमदारांना विचारा. उपोषणाची हौस असेल तर माजी आमदारांच्या घराबाहेर उपोषण करा. रखडलेल्या कामांचा जाब मागा. तेव्हा तुमच्या दहा-पंधरा कार्यकर्त्यांऐवजी जनता मोठ्या संख्येने तुमच्यासोबत उभी राहील,” असा दावा त्यांनी केला.
‘AI व्हिडिओ बनवणे म्हणजे सामाजिक कार्य नव्हे!’
वैभव नाईक यांच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी AI व्हिडिओंचा आधार घेतला जात असल्याची टीकाही मयेकर यांनी केली.“एका बाजूला स्वच्छतेच्या मुद्द्यावर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच नगरसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन फोटोसेशन करायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. इतरांच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा मालवणच्या भल्यासाठी प्रत्यक्ष सामाजिक कार्य करा,” असा सल्ला त्यांनी राधिका मोंडकर यांना दिला.






Subscribe to my channel






