पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची तातडीने विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक

कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील पुलाजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या अंड्यांची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित व्यावसायिकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याला सावंतवाडी येथून घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या सहकार्याने महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे उपअभियंता उपस्थित होते. अंड्यांचा खच तातडीने हटविण्यात आल्याने परिसरातील संभाव्य दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न टळला आहे.घटनेची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी धाव घेत समस्या मार्गी लावल्याबद्दल दादा साईल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!