“तुम्ही मला जिंकवलंय; आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय!”

आ. निलेश राणेंचा निर्धार; कुडाळच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ जाहीर, विरोधकांच्या श्रेयवादावरही निशाणा

कुडाळ : “तुम्ही मला जिंकवलंय; आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय!” या शब्दांत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासाचा आपला निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे राहू नये, यासाठी मोठ्या विकासकामांना गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मागील दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. मला यातून काहीही मिळवायचं नाही; या मतदारसंघात मोठमोठी विकासकामे करायची आहेत,” असे सांगत आ. राणे यांनी विकासाला राजकारणापेक्षा प्राधान्य देण्याचा संदेश दिला.

कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून भंगसाळ नदीकिनारी साकारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश घाट व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी आ. निलेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी कुडाळ शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट केली.

“माझी कोणाशीही स्पर्धा नाही; मला मतदारसंघ जिंकवायचा आहे!”

गणेश घाटाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या राजकारणावर आ. राणे यांनी विरोधकांना नाव न घेता थेट लक्ष्य केले. कामाची मंजुरी, निविदा, वर्क ऑर्डर आणि भूमिपूजनाच्या तारखांचा उल्लेख करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कधीही दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही. माझे आहे ते पुराव्यासह सांगता आले पाहिजे,” असे ते म्हणाले. त्याचवेळी जनतेला गृहीत धरून राजकारण करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले. “जनतेला गृहीत धरू नका. जो काम करेल तोच टिकेल. माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मला माझा मतदारसंघ जिंकवायचा आहे,” असे आ. राणे यांनी ठणकावून सांगितले. विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या नकारात्मक राजकारणाला थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

कुडाळ शहरासाठी मोठ्या प्रकल्पांची तयारी

कुडाळ शहराला २१व्या शतकातील आधुनिक आणि जागतिक दर्जाचे सुंदर शहर बनविण्याचा संकल्प आ. राणे यांनी व्यक्त केला. आगामी काळात शहरातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. यामध्ये मच्छिंद्रनाथ कांबळी सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शहरातील मुख्य डीपीआर रस्ता, एसटीपी प्लांट आणि पाणीपुरवठा प्रकल्प यांसह विविध कामांचा समावेश आहे. नगरपंचायतीने शहरातील उर्वरित विकासकामांची यादी तयार करून ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

“आपण मालक नाही, सेवक आहोत!”

नगरपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबाबत स्पष्ट सूचना देताना आ. राणे यांनी प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित केली. “आपण कुडाळचे मालक नाही, तर सेवक आहोत. लोकांना आवडेल, शहराच्या हिताचे असेल तेच काम करा. कामाच्या दर्जावर कोणताही डाग लागू देऊ नका,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश घाटाने कुडाळच्या सौंदर्यात भर; पर्यटनालाही चालना

भंगसाळ नदीकिनारी साकारण्यात आलेल्या गणेश घाटामुळे नागरिकांना गणेश विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध झाली असून, घाट परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्वागत कमान, बैठक व्यवस्था, कारंजे आणि परिसर सुशोभीकरण यामुळे घाटाला नवे रूप प्राप्त झाले आहे.

गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या वेळी सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ नगरपंचायतीने सुंदर गणेश घाट साकारल्याचे सांगितले. आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी गणेश घाटामुळे विसर्जनाची सुविधा मिळण्याबरोबरच कुडाळच्या पर्यटनालाही नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गणेश घाटाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. हा प्रकल्प श्रद्धा, भावना आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, प्रसाद रेगे, काका कुडाळकर, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख तथा जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष पी.डी. शिरसाट, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली व विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, ॲड. राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, निलेश परब, गणेश भोगटे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, पर्यटन संचालनालयाचे उपअभियंता ऋषिकेश नारकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, भाजपचे पप्या तवटे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, पावशी सरपंच वैशाली पावसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब व निता राणे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर व उपनगराध्यक्ष शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

error: Content is protected !!