मालवण पोलिसांची अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई 

दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापासत्र ; गांजाचा मोठा साठा हस्तगत, दोघे ताब्यात

मालवण : मालवण शहरात अंमली पदार्थाचा मोठा बाजार सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच शनिवारी मालवण पोलिसांनी अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा काळबादेवी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या दोन वेगवेगळ्या छाप्यात पोलिसांनी दोन संशयितांना गांजासह रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे. या कारवाईत सुमारे दीड किलो गांजाचा साठा पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली. यामध्ये पोलिसांनी दोन वेगवेगळ्या भागांतून संशयितांना ताब्यात घेतले. यात कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिराजवळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी राजन गणेश चव्हाण (वय २६, रा. वायरी भरड) या संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले. मेढा काळबादेवी परिसरात केलेल्या दुसऱ्या कारवाईत विल्सन सेबेस्टीयन फर्नांडिस (वय २५, रा. कुंभारमाठ) याला गांजा बाळगल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले.पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयितांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडे हा गांजा कुठून आला आणि ते तो कोणाला विकणार होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांच्या नेतृत्वाखाली इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक आणि यशस्वी कारवाई केली.

यापूर्वीही मालवण परिसरात गांजा पकडण्याच्या कारवाया झाल्या आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालवणात अमली पदार्थांचे जाळे पसरू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी पुन्हा एकदा ही धडक कारवाई करून अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मालवण परिसरातून आणि नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!