डॉ. शिल्पा झाटये यांचे प्रतिपादन ; १०० इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन



पुस्तकातील निवडक कवितांचा संग्रह काढून मालवणातील वाचनालयांना मोफत देण्याचा मानस
मालवण | कुणाल मांजरेकर
येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झाटये यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘१०० शिल्पा कविता ह्या इंग्रजी काव्य संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते नुकतेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक लिहिताना खूप जणांनी मला प्रोत्साहन दिले. माझे हे लेखन टीम वर्क आहे. या पुस्तकाचे सर्व श्रेय माझे झाटये कुटुंबीय आणि माझ्या स्टाफचे आहे, असे त्या म्हणाल्या. हे पुस्तक लेखन माझा व्यवसाय नाही. या पुस्तकातील निवडक कवितांचे स्वतंत्र पुस्तक काढून मालवण मधील वाचनालयांना मोफत स्वरूपात देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
१ ते ८ मार्च जागतिक महिला दिन सप्ताह म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने डॉ. शिल्पा झाटये यांनी लिहिलेल्या १०० शिल्पा कविता पुस्तकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला टोपीवाला हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रदीप साटम, भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर, साहित्यिक रुजारिओ पिंटो, सौ. मेघना जोशी यांच्यासह डॉ. शिल्पा झाटये, डॉ. अविनाश झाटये उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय शिंदे यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख डॉ. अविनाश झाटये यांनी करून दिली.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाट्न करून अनोख्या पद्धतीने पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी डॉ. शिल्पा झाटये पुढे म्हणाल्या, समाजात डिप्रेशन वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणायचं असेल तर सकारात्मक दृष्टीने सगळीकडे बघितलं पाहिजे. तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने एक छंद निवडणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण बॅडमिंटन व लेखनाचा छंद निवडल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रदीप साटम म्हणाले, या काव्य संग्रहातील काही कवितांचे मी परीक्षण केले आहे.ह्या कविता तुम्हाला जीवनाच्या प्रवासात नेहमीच मार्गदर्शक ठरतील. प्रा. वाय. आर. राजूरकर म्हणाले, डॉ. शिल्पा झाटये यांच्या इंग्रजी भाषेतील या कविता संग्रहातील अप्रतिम कविता वाचून मी भारावून गेलो आहे. या काव्य संग्रहातील प्रत्येक कविता ह्या संवेदनशील मनाने लिहिल्या आहेत. देश घडवायचं असेल तर या प्रत्येक कवितेतील भावार्थ शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मॅडम या प्रतिथ यश डॉक्टर आहेत. त्यांना साहित्याबद्दल प्रेम लागले आहे. भावनांचा कमालीचा आविष्कार त्यांच्या काव्य संग्रहात पाहायला मिळाला आहे. माणसाने जीवनात काय शिकावे हे या पुस्तकातील कवितांनी शिकवलं आहे. या पुस्तकातील प्रत्येक कवितेत काहीतरी दडलेलं आहे, असे सांगून जगाला चांगलं द्या, जग तुम्हाला चांगलं देईल. शिल्पा झाटये यांच्या या कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे ते म्हणाले.
साहित्यिक सौ. मेघना जोशी म्हणाल्या, डॉ. शिल्पा झाटये या स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वतच्या वडिलांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना १०० कवितांच्या पुस्तकाची भेट दिली आहे. प्रतिथ यश डॉक्टर असूनही त्यांना पेटी वादन, बॅडमिंटन, यासारखे छंद आहेत. अनेकजण वेळ नाही,वेळ नाही असं सांगून स्वतःचे छंद जोपासत नाहीत. पण मॅडम नी आपली रुग्णसेवा जपत स्वतःचे छंद जोपासले आहेत. कवयित्री म्हणून त्यांचा नवीन गुण आज सर्वांसमोर आला आहे. अनेक सुंदर कविता त्यांनी या काव्य संग्रहात मांडल्या असून इंग्रजी शब्द रुपी संपत्ती आपल्या वडिलांना भेट म्हणून लिहिली आहे. हे पुस्तक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवणे आवश्यक आहे. प्रशालांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचे वाचन ठेवावे, असे सांगून वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे साहित्यिक क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहावा, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात माधवी पंडित, डॉ. प्रफुल्ल गोडकर यांच्या प्रतिक्रियांचे वाचन झाले. तर डॉ. शशिकांत झाटये यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले.

Subscribe to my channel




