न्यायालयीन कोठडी नंतर पोलीस कोठडी… नक्की काय आहे प्रकरण ?
नितेश राणे प्रकरणाबाबत सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनी दिली माहिती
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आज दुपारी अचानक कणकवली न्यायालयात शरण जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी कणकवली न्यायालयाने त्यांची सर्वप्रथम न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र मागाहून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर नितेश राणे यांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडी नंतर आ. नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय आहे हे प्रकरण… ? याबाबत विशेष सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनीच सविस्तर माहिती दिली आहे.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांमुळे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आमदार राणेंवर गुन्हा आहे केल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र हा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला. मात्र हा जामिन फेटाळताना जिल्हा न्यायालयाने त्यांना कणकवली न्यायालयात शरण जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज दुपारी आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण गेले. याठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र सायंकाळी नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची बातमी येऊन धडकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीच माहिती देत याचे स्पष्टीकरण दिले आहे. आ. राणेंना अगोदर न्यायालयीन कोठडी दिली, तेव्हा या प्रकरणी सुनावणी झाली नव्हती. आरोपीने न्यायालयात शरणागती पत्करली तेव्हा त्याला ताब्यात घेण्यासाठी ही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाला आमचे म्हणणे ऐकून घेणे भाग होते. यावेळी आम्ही केलेला युक्तिवाद कोर्टाला मान्य झाला. या प्रकरणी दुसरा आरोपी राकेश परब याची पोलीस कोठडी ४ फेब्रुवारीला संपत असल्याने दोन्ही आरोपींची एकत्र चौकशी करण्यासाठी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कालावधीत पोलीस तपासात योग्य प्रगती झाली तर आम्ही आणखी पोलीस कोठडी मागू शकतो, असे ऍड. प्रदीप घरत म्हणाले.