तोंडवळी–तळाशील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; सीआरझेड अंतर्गत सशर्त पर्यावरणीय मंजुरी

मालवण : मालवण तालुक्यातील तोंडवळी–तळाशील (सुरुचे वन मार्ग) या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३३ च्या विशेष दुरुस्ती कामाला महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (MCZMA) सीआरझेड अंतर्गत सशर्त पर्यावरणीय परवानगी मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रस्त्याच्या दुरुस्तीतील महत्त्वाचा प्रशासकीय टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर प्राधिकरणाच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या २०२ व्या बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर या कामाला मंजुरी देणारे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. प्रस्तावित रस्त्याची एकूण लांबी ८७७.३३ मीटर असून रुंदी ७.५ मीटर आहे. किनारपट्टीवरील पर्यावरणाचे संरक्षण आणि संबंधित पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.

तोंडवळी आणि तळाशील या गावांना जोडणारा हा रस्ता स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच या मार्गामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यावसायिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या मार्गाच्या विशेष दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती.

आता सीआरझेड अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय परवानगी मिळाल्याने रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जाण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या कामासाठी आवश्यक परवानगी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे तोंडवळी व तळाशील येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

error: Content is protected !!