
विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
वेंगुर्ला : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा-२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
वेंगुर्ला हायस्कूल येथे झालेल्या या स्पर्धेला भाजपा महाराष्ट्र युवानेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष रंगत आली. वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे दमदार आणि सुरेल सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेला.
यावेळी विशाल परब म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दलचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कार अधिक दृढ होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे.”
स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक समूहाने आपल्या सादरीकरणातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.‘चला, विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागवूया राष्ट्रप्रेम!’ या प्रेरणादायी संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
देशभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, नगरसेविका ॲड. सुषमा खानोलकर, आकांक्षा परब, काजल कुबल, रिया रेडकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रितम सावंत, वृंदा गवंडळकर, ज्येष्ठ परीक्षक शांताराम आसोलकर, परीक्षक भास्कर मेस्त्री, महेंद्र वायंगणकर, दिपेश परब, वेताळ प्रतिष्ठान तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळेकर, सचिव विवेक तिरोडकर आदी उपस्थित होते.






Subscribe to my channel






