अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा ; तीन जण अटकेत

दोघेजण फरार ; अटकेतील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथे समुद्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या खलाशी अंतोन सालू आल्मेडा (३८, रा. रेवतळे मालवण) यांच्या मृत्यू प्रकरणी मालवण पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लहू भिकाजी जोशी (रा. दांडी), मार्शल फर्नांडिस (रा. बाजारवाडा) आणि नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (रा. वायरी भूतनाथ) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात दोन संशयित फरार आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले. या प्रकरणी अंतोन यांच्या पत्नीने फिर्याद दाखल केली आहे.

रेवतळे आदर्शनगर येथील मच्छीमार अंतोन सालू आल्मेडा (३८) मालवण बंदरातून मासेमारीस गेले असता १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह १९ ऑक्टोबर रोजी रात्री निवती रॉकजवळच्या खोल समुद्रात तरंगताना दिसला. त्यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह अंतोन यांचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र, आल्मेडा यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अंतोन यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. या प्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. अंतोन यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस तपासानंतर पाच जणांवर भा द वि कलम 304, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!