रो-रो बोट सेवेसाठी मोठे पाऊल; निविदा प्रक्रिया जारी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या घोषणेला गती, आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश!
शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी मानले आभार
मालवण : सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेसाठी आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या सेवेसाठी तारकर्ली येथील अस्तित्वातील जेटीचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ४ कोटी ९७ लाख १९ हजार ८४० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जलपर्यटनात क्रांती घडविण्यासाठी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी तारकर्ली ते कोरजाई दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने तारकर्ली जेटीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रो-रो बोट सेवा सुरू झाल्यानंतर पर्यटकांना जलमार्गाने प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे तारकर्ली, कोरजाईसह परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधींनाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.
या महत्त्वपूर्ण कामाला मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत. तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.




Subscribe to my channel




