
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा सल्ला ; भाजी मार्केट, सफाई कामगार इमारत देखील त्यांच्याच दुर्लक्षामुळे प्रलंबीत ; भुयारी गटारच्या रखडलेल्या कामावरूनही नाराजी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेला मत्स्यालयासाठी उपलब्ध झालेला ५ कोटींचा निधी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मागे गेल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी समाचार घेतला आहे. मत्स्यालयाचा निधी परत का गेला, हा प्रश्न खरं तर वैभव नाईक यांनी इतरांऐवजी स्वतःला विचारणे अपेक्षीत होते, म्हणजे त्याचे खरे उत्तर मिळाले असते. प्रशासनातील दिरंगाई ही आमचा कालावधी २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरू झाल्यावर सुरू झाली होती आणि त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार वैभव नाईक २०२१ ते २०२४ च्या विधानसभा निवडणूक कालावधीपर्यंत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याच कालावधीत प्रशासन दिरंगाई करत होते. त्यावेळी वेळोवेळी तत्कालीन प्रशासक संतोष जिरगे हे मनमानी कारभार करत असल्याबाबत आम्ही त्यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने सोशल मीडिया, वृत्तपत्राच्या माध्यमातून आमची भूमिका मांडत होतो. त्यावेळी वैभव नाईक यांनी प्रशासकावर अंकुश ठेवला असता तर कदाचित मत्स्यालय निधी परत पाठवण्याची नामुष्की आली नसती, असा टोला श्री. कांदळगावकर यांनी लगावला आहे. केवळ मत्स्यालय नाही तर भाजी मार्केट इमारत, सफाई कामगार इमारत देखील त्यांच्याच कालावधीत रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुठल्याही निधीला एक कालावधी असतो आणि त्या कालावधीत काम झाले नाही तर शासनाला तो परत करायला लागतो हा नियम आहे. मत्स्यालयाच्या जागेकडे जाण्याच्या वाटेबाबतचा भूसंपादनाचा विषय होता, तो आमच्या कालावधीत सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. जागा मालकांबरोबर अनेक बैठका पण झाल्या होत्या. पण आमचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकीय कालावधीत याबाबत कुठलेही प्रयत्न न झाल्यामुळेच हा निधी परत पाठवावा लागला आहे ही वस्तुस्थिती आहे.
मत्स्यालय हा एकच विषय नाही तर भाजी मार्केट इमारतीचे काम जे आमच्या कालावधीत सुरू झाले होते, ते सीआरझेड परवानगीमुळे अडले होते. हा विषय प्रशासकीय तीन चार वर्षाच्या कालावधीत सोडवला गेला नाही, त्यामुळे ही इमारत अपूर्ण आहे. आमदार निलेश राणेसाहेबांनी निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या आढावा बैठकीत हा विषय घेतल्याने आता याबाबत हा विषय परवानगी स्तरावर आहे. त्याचप्रमाणे मालवण नगर परिषद सफाई कामगार इमारतीसाठी आम्ही केलेल्या ठरावामध्ये काही त्रुटी राहिल्याने नव्याने दुरुस्ती करून नवीन ठराव करून देणे बाबत, तसेच काही मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याबाबत शासनाने कळविल्याने ते देणे आवश्यक होते. पण तत्कालीन मुख्याधिकारी जिरगे यांनी याबाबत ना ठराव केला, ना मुदतीत उत्तर दिले, ना संबधित विकासक याला काम बंद करण्याबाबत पत्र दिले. याबाबत पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. याबाबतही तत्कालीन आमदार नाईकसाहेब यांनी योग्य पाठपुरावा केला असता तर आज ही इमारत तयार झाली असती.
आमच्या कालावधीत पर्यटक सुविधा म्हणून पाच बायोटॉयलेट गाड्या घेतल्या होत्या. प्रशासकीय काळात त्याचा वापर होत नसल्याबाबत सुचना करूनही त्याबाबत काहीही कार्यवाही न केल्याने या गाड्या नादुरुस्त झाल्या. या नादुरुस्त गाड्याची दुरुस्ती आमचे आमदार निलेशजी राणे यांनी निवडून आल्यावर स्वखर्चाने करून दिल्या आहेत. तसेच कचऱ्यापासून खत निर्मितीच्या मशीन नादुरुस्त असल्याने दुरुस्त करून घेणे बाबत पाठपुरावा करूनही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. त्या मशीन सुद्धा आमदार निलेशजी राणे यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून दिल्या होत्या.
मच्छीमार बांधवाना गृहीत धरून मालवण नगर परिषद मच्छी मार्केट येथे बांधलेल्या गाळ्याचे भाडे ठरवून भाड्याने देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कुठलीही कार्यवाही केली गेली नाही. गाळ्यांचे लिलाव, नगर परिषद मुदत संपलेल्या भाड्याच्या इमारती कित्येक वर्ष न झाल्याने नगर परिषदेला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हे लिलाव का लावले नाही म्हणून सध्याच्या मुख्य अधिकारी यांना प्रश्न विचारता तर त्या वेळच्या प्रशासकाला जाब विचारला असता तर हे नुकसान झाले नसते.
भुयारी गटार योजना आमच्या मुदतीत व्हावी म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केले. हा ठेकेदार बदलला असता तर नवीन टेंडर प्रक्रिया करणे, यासाठी जादा निधी उपलब्ध करून घेणे, तसेच जुन्या ठेकेदाराला काढून टाकल्यावर त्यांच्या कडून कायदेशीर कारवाईत आपली योजना अडकून राहील याचा विचार करूनच आम्ही त्याच ठेकेदाराकडून काम करून घेण्याबाबत प्रयत्न केले. जर आमची भूमिका चुकीची होती तर तेव्हा अधिकार वाणीने ठेकदार बदलणे बाबत सूचना केली असती तर आम्ही ते पण केले असते. पण याचा दोष तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून आमच्यावर देणे चुकीचे आहे. आमच्या कालावधीत काही प्रमाणात आम्ही भुयारी गटारचे काम करून घेतले आहे. पण आमचा कालावधी संपल्या नंतर प्रशासकीय कालवधीत एक टक्का पण काम झाले नाही आणि कोट्यवधीची बिल अदा केली गेली. त्यावेळी या दीर्घ प्रशासकीय कालावधीत हा ठेकेदार बदलण्याची कारवाई का झाली नाही याच पण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमचा कालावधी संपल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने प्रशासक संतोष जिरगे यांच्या मनमानी कारभाराबाबत दोन अडीज वर्ष आम्ही भूमिका मांडत होतो पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, ना आमच्या सूचनांवर प्रशासक यांच्याकडे पाठपुरावा केला गेला. आता ज्याप्रमाणे मुख्याधिकारी यांना जाब विचारला गेला तसा जाब आमच्या वेळी आम्हाला घेऊन तत्कालीन प्रशासक जिरगे यांना का विचारला गेला नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे.
त्यामुळे पूर्वी आवश्यक पाठपुरावा न केल्यामुळे न झालेल्या कामांचे खापर नूतन मुख्याधिकारी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बसलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर फोडणे योग्य नाही. आम्ही नेहमी जाहीर कबुली दिली आहे की जर चांगल्या कामाचे श्रेय माझे आहे तर चुकीच्या कामाची जबाबदारी पण माझीच आहे. सध्या आमचे पक्षप्रमुख तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार नारायणराव राणे, आमचे आमदार निलेशजी राणेे, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या मार्फत कोट्यवधीचा विकास निधी मालवण नगर परिषदेस प्राप्त होत आहे, याचा आकडा जेव्हा वर्षाच्या शेवटी जाहीर होईल तेव्हा तो मालवण वासियांसाठी नक्कीच सुखावह असेल यात शंका नाही, असे महेश कांदळगांवकर यांनी म्हटले आहे



Subscribe to my channel




