मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक उपचारांची ही सुविधा पुन्हा अनिश्चिततेत आली आहे. त्यामुळे संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांनी केली आहे.

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होऊन डॉक्टर रुजू झाल्यानंतर त्यांचे स्वागतही करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील महिला रुग्णांसाठी आवश्यक असलेली तज्ज्ञ वैद्यकीय सेवा नियमितपणे उपलब्ध होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, सुमारे पंधरा दिवस सेवा बजावल्यानंतर संबंधित डॉक्टर सध्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे मयेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या डॉक्टरांची सेवा पुन्हा मालवणमध्ये सुरू होणार आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

“डॉक्टरांची नियुक्ती होणे ही स्वागताची बाब आहे, मात्र त्यांची सेवा सातत्याने उपलब्ध राहणे त्याहून महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना पुन्हा मालवण ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी गौरी मयेकर यांनी केली.

ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध असल्यास गर्भवती महिला, प्रसूतीपूर्व तपासणी तसेच विविध स्त्रीरोगांच्या उपचारांसाठी नागरिकांना बाहेरच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे ही सेवा कायमस्वरूपी आणि नियमित स्वरूपात उपलब्ध राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा मयेकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, “डॉक्टर पुन्हा सेवेत उपलब्ध करून द्या, स्वागताचा उद्देशही सार्थ ठरेल,” अशा शब्दांत मयेकर यांनी आपली भूमिका मांडली.

error: Content is protected !!