वाभवे – वैभववाडी न. पं. च्या नगराध्यक्षपदी नेहा माईणकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत

दोन अपक्ष नगरसेवक मतदानापासून अलिप्त ; आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा न.पं. वर भाजपाचा झेंडा

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड झाली आहे. या नगरपंचायतीवर आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे. येथील नगर पंचायत सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली राजमाने व सुरज कांबळे यांनी काम पाहिले. भाजपाच्या नेहा माईणकर यांना दहा मते मिळाली. तर शिवसेनेच्या सानिका रावराणे यांना पाच मते मिळाली. तसेच उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सावंत यांना दहा मते मिळाली. तर सेनेचे रणजीत तावडे यांना पाच मते मिळाली. अक्षता जैतापकर व सुभाष रावराणे हे दोन अपक्ष नगरसेवक मतदानापासून अलिप्त राहिले.

नेहा माईणकर व संजय सावंत यांची निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार केला. निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच कु. माईणकर व सावंत यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात मोठी गर्दी केली होती. तसेच ढोल ताशाच्या गजरात नगरपंचायत ते भाजपा कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, अरविंद रावराणे, विकास काटे, स्नेहलता चोरगे, शुभांगी पवार, हर्षदा हरयाण, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, सुधीर नकाशे, सुनील रावराणे, राजू पवार, डॉ. राजेंद्र पाताडे, प्रकाश माईणकर, संतोष माईणकर प्रदिप नारकर संताजी रावराणे, रमेश शेळके, संतोष कुडाळकर, अंकित सावंत, दीपक माईनकर, सदानंद माईनकर, दाजी पाटणकर व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेवक रोहन रावराणे, विवेक रावराणे, राजन तांबे, रेवा बावधाने, संगीता चव्हाण, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, सुंदरी निकम आदी उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!