“रत्नागिरी” निवासी पालकमंत्र्यांकडून आंगणेवाडी यात्रेची प्रथा परंपरा खंडीत !
आंगणेवाडी गावाला भेट देऊन आढावा घेण्याचे सौजन्य नाही : सुदेश आचरेकर यांची टीका
२५ % व्यापाऱ्यांना यात्रेत प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे छोटे व्यापारी उध्वस्त होण्याची भीती
कुणाल मांजरेकर
मालवण : आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाचे स्थान आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक पालकमंत्र्याने यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडीत येऊन येथील परिस्थितीची पाहणी करत आढावा बैठक घेतली. मात्र रत्नागिरीचे निवासी असलेल्या विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर एकदाही आंगणेवाडी गावाला भेट देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. त्यामुळे पूर्वीपासून चालत आलेली प्रथा परंपरा उदय सामंत यांनी मोडीत आल्याची टीका भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यंदा पालकमंत्र्यांनी आंगणेवाडीची आढावा बैठक कुडाळमध्ये आयोजित केली होती. यावरून त्यांना आंगणेवाडीचे कोणतेही सोयरसुतक नसून केवळ रुटीन बैठक घेऊन सोपस्कार पुर्ण करण्याचे काम त्यांनी केल्याचे श्री. आचरेकर यांनी म्हटले आहे.
येथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी श्री. आचरेकर म्हणाले, आताच्या राज्यकर्त्यांना आंगणेवाडीच्या भराडीदेवी बाबत कोणतीही श्रद्धा नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले आहे. उदय सामंत यांच्याप्रमाणेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी देखील यंदा आंगणेवाडीला भेट देण्याचे टाळल्याने आजपर्यंत आंगणेवाडी बाबत प्रेम असल्याचे शिवसेना दिखावा करत होती का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आंगणेवाडीची जत्रा होऊ शकली नव्हती. त्यावेळी भाविकां सोबतच आंगणेवाडी ग्रामस्थांनी कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. मात्र यावर्षी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. प्रशासन आणि आंगणेवाडी ग्रामस्थ शिस्तबद्ध पद्धतीने कोविडचे नियम पाळून यंदाची आंगणेवाडी यात्रा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असताना पालकमंत्री उदय सामंत यामध्ये “खो” घालण्याचे काम करत आहेत.
… तर छोटे व्यापारी उध्वस्त होतील !
यंदाच्या आंगणेवाडी जत्रेत केवळ २५ टक्के व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचा पालकमंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतला आहे. हा निर्णय अतिशय अयोग्य असून यात्रेच्या दोन दिवसात छोटे-मोठे व्यवसाय करून उत्पन्न मिळवणाऱ्या गोरगरिबांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा घाट पालकमंत्र्यांकडून घातला जात असल्याचा आरोप सुदेश आचरेकर यांनी केला. आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापारी कच्चा माल खरेदी करतात. मात्र अचानक पालकमंत्र्यांच्या २५% च्या निर्णयामुळे या सर्वांचे आर्थिक नुकसान होणार असून यामुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त होतील. त्यांच्यावर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालकमंत्री आणि प्रशासनाने सदरील निर्णयाबाबत फेरविचार करावा असे सांगतानाच आई भराडीने या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी आणि आंगणेवाडीची जत्रा निर्विघ्नपणे पार पाडावी, अशी अपेक्षा सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केली आहे.