पद गेले, सत्ता बदलली; पण ‘वैभव नाईक फॅक्टर’ कायम!

नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टिकेला उबाठा महिला शहर संघटक राधिका मोंडकर यांचे प्रत्युत्तर

मालवण : मालवण नगरपालिकेच्या कारभारा विरोधात उबाठा नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी जाहीर केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी शिंदेसेनेच्या लोकप्रतिनिधीनी दिलेल्या प्रत्युत्तरात माजी आमदार वैभव नाईक टिकेच्या केंद्रस्थानी राहिले. या आरोपांना उबाठा महिला शहर संघटक राधिका मोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत पराभव झाला, पद गेलं, राजकीय समीकरणं बदलली; पण कुडाळ-मालवणच्या राजकारणातील ‘वैभव नाईक’ हा विषय मात्र अजूनही संपलेला दिसत नाही. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, आजही अनेक राजकीय चर्चांचा संदर्भ मागे वळून वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळाकडे जाताना दिसतो. त्यामुळे पद गेले, सत्ता बदलली, पण ‘वैभव नाईक फॅक्टर’ कायम असल्याचे सौ. मोंडकर यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत वैभव नाईक यांनी स्वतःला ‘माजी आमदार’ सुद्धा म्हणू नका, अशी भूमिका घेतली होती. मात्र, राजकारणात पद बदलले म्हणून एखाद्या नेत्याचा जनसंपर्क, कार्यपद्धती आणि राजकीय प्रभाव एका दिवसात संपत नाही. कुडाळ-मालवणमध्ये गेल्या ११ वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांच्या हालचालींवर निर्बंध असताना कुडाळ-मालवणमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांची धग कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्याच काळात अनेक युवा कार्यकर्ते राजकारणात पुढे आले. त्यातील काही जण आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नेते म्हणून कार्यरत आहेत.

‘दांडी महोत्सवा’ने दाखवला वेगळा मार्ग

कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसताना आणि पावसाची मोठी शक्यता असतानाही आयोजित करण्यात आलेला ‘दांडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव २०२२’ हा त्या काळातील वेगळा प्रयोग ठरला. स्थानिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच छोटे व्यावसायिक, कलावंत आणि होतकरू युवकांना व्यासपीठ मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. राजकारणापलीकडे स्थानिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

फाईलपेक्षा ‘फिल्ड’वर अधिक दिसणारा आमदार

मालवण शहरातील मच्छी मार्केट, भाजी मार्केट, कचरा व्यवस्थापन, तुंबलेल्या गटारांचे प्रश्न, नूतन बंदर जेटी, किल्ले सिंधुदुर्गवरील सिंहासन अशा स्थानिक विषयांवर प्रशासनाला जाब विचारण्याची त्यांची शैली कायम चर्चेत राहिली. अनेकदा दुचाकीवरून शहरातील प्रश्नांच्या ठिकाणी पोहोचणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. तौक्ते चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीतही ते स्वतः रस्त्यावर उतरले. नेत्याच्या दौऱ्यापेक्षा नागरिकांच्या अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

कामांच्या यादीत शहरापासून पर्यटनापर्यंत

कुत्र्यांचे निर्बिजीकरण, कचरा व्यवस्थापनाचे तांत्रिक सक्षमीकरण, व्यापाऱ्यांच्या सहभागातून अग्निशमन वाहनांचे उद्घाटन, बीच क्लिनिंग मशीन व्हेईकल, मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीचा आराखडा, आडारी-धुरीवाडा सुशोभीकरण अशा विविध विषयांचा त्यांच्या कार्यकाळाशी संबंध जोडला जातो. विधानसभेत तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न मांडण्याची त्यांची शैलीही प्रभावी ठरली. विशेष म्हणजे, कोणताही मोठा राजकीय वरदहस्त नसतानाही सभागृहात स्थानिक प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

निवडणुकीचा निकाल वैभव नाईकांच्या विरोधात गेला असेल, पण राजकीय चर्चेतील त्यांची उपस्थिती संपलेली नाही, हे मात्र या सगळ्या चित्रातून स्पष्ट होताना दिसते. म्हणूनच कुडाळ-मालवणच्या राजकारणात आज एकच प्रश्न पुन्हा पुन्हा ऐकू येतोय, ‘पराभव निवडणुकीत झाला… पण वैभव नाईकांचा राजकीय प्रभाव खरोखर संपला आहे का?’ असा सवाल राधिका मोंडकर यांनी केला आहे.

error: Content is protected !!