
तात्काळ निर्णय द्या, युवा व्यापाऱ्यांची आग्रही मागणी ; अन्यथा मालवणातही “जेन Z” ची ताकद दाखवून देण्याचा इशारा
नगरपालिकेच्या सभेत विषय घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्गावर भरणारा सोमवारचा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी मालवणच्या शेकडो व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेला धडक दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्यासह व्यापारी महासंघाचे अनेक पदाधिकारी, ज्येष्ठ व्यापारी, भाजी विक्रेत्या महिला यांसह युवा व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात आदींनी या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आठवडा बाजारावर लवकरच निर्णय घेऊ, असे नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. मात्र या उत्तराने युवा व्यापाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत २०२० पासून कोरोनाचे कारण सांगून तात्पुरत्या स्वरूपात देऊळवाड्यात नेलेला आठवडा बाजार आज सहा वर्ष त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे आता हा आठवडा बाजार हलवण्यासाठी आणखी वेळ काढू नका अन्यथा जनरेशन झेडची ताकद मालवणातही दाखवून दिली जाईल, असा संतप्त इशारा व्यापाऱ्यांनी दिला. दरम्यान, हा विषय संपूर्ण शहराशी निगडित असल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन वाळके, नितीन तायशेटे यांच्यासह ज्येष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, रवी तळाशीलकर, शेखर गाड, दीपक बिरमोळे, विजय चव्हाण, हर्षल बांदेकर, हरेश देऊलकर, मयु पारकर, सचिन आरोलकर, सरदार ताजर, नगरसेवक मंदार ओरस्कर, राजू सावंत, कुलदीप बांदेकर, अभय कदम, प्रसाद धारगळकर, चेतन सकपाळ, नगरसेविका मेघा सावंत, संभव कुडाळकर, शैलेश बेलवलकर, अमित वणकुद्रे, विवेक पारकर, सर्वेश पाटकर, गौरी मयेकर, सौ साधना चव्हाण, सुनंदा चव्हाण, सानिका लोके, आरती शिरोडकर, शुभदा शिरोडकर, स्मिता मसूरकर, आरती मांजरेकर, शकुंतला कोरगावकर, प्राची पारकर, सिद्धी बांदेकर, सायली सामंत, शोभा लोके, सुवर्णलता बिरमोळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, युवा व्यापारी उपस्थित होते.
यावेळी मालवण व्यापारी संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यात म्हटले आहे की, मालवण हे ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. कित्येक वर्षांपासून सोमवार पेठ येथे आठवड्याचा मुख्य बाजार परंपरेने भरत होता. कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांमुळे तात्कालीन नगराध्यक्ष व प्रशासनाच्या सूचनेनुसार हा बाजार तात्पुरता सागरी महामार्ग, देऊळवाडा येथे हलवण्यात आला होता. त्यावेळी त्यासाठी ठराविक मुदतही घालून देण्यात आली होती. परंतु कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतरही बाजार पूर्ववत सुरू करण्यात आला नाही. सध्या सागरी महामार्गावर बाजार भरविल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत: यात सोमवारी महामार्गावर बाजार भरल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. मोठ्या वाहनांमुळे ट्रॅफिक जाम व लहान-मोठे अपघात होत आहेत. गावाबाहेरून येणाऱ्या लक्झरी बसेस मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या जनतेला प्रचंड अडथळा होतो. बाहेरचे व्यापारी थेट महामार्गावर व्यापार करून निघून जातात. त्यामुळे बाहेरून आलेले ग्राहक मुख्य बाजारपेठेत येत नाहीत. याचा मालवणच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. मासे मार्केट, कोकणी मेवा व खेडेगावातून येणारा पारंपारिक भाजीपाला या सर्व वस्तू एकत्रित मिळण्याचे ठिकाण म्हणजे सोमवार पेठचा बाजार होता. त्यामुळे बाजारपेठ आठही दिवस गजबजलेली असे.
सध्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अत्याधुनिक पार्किंग तयार झाले असून जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी या ठिकाणीही बाजार भरत होता. तसेच नेरुरकर गल्ली, सकपाळ नाका गल्ली, सारस्वत बँक समोरील गल्ली येथे बाजार भरल्यास पूर्ण बाजारपेठ गजबजेल. नगरपालिकेने दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी केलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण येणार नाही. मासे मार्केट जवळ असल्याने सर्व व्यवस्था सुलभ होईल व पर्यटकांनाही खरेदीसाठी सोयीचे होईल. यामुळे शहराची व्यावसायिक वाढ होऊन नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. तरी मालवण शहरात सध्या दोन ठिकाणी भरत असलेला आठवडा बाजार बंद करून सोमवार पेठ येथील पारंपारिक आठवडा बाजार पूर्ववत एकत्रित सुरु करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता पुढाकार
मालवण देऊळवाडा सागरी महामार्गावर भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून रुग्णवाहिकेला देखील येथून वाट काढताना मुश्किल होत असल्यामुळे हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत नेण्याची मागणी सर्वात अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मालवण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग व मालवण नगरपालिकेकडे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अलीकडेच मालवण तहसीलदारांनी नगरपालिकेला लेखी पत्र देत मनसेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आठवडा बाजाराबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी सूचना केली होती. यानंतर देऊळवाडा येथील काही नागरिकांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आठवडा बाजार सागरी महामार्गावरच कायम ठेवावा अशा मागणीचे निवेदन सादर केले होते. या निवेदनामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक होत मंगळवारी नगरपालिकेला धडक देत शक्तीप्रदर्शन दाखवले. यावेळी गॅरी अन्ननसिएशन यांनी देखील आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर भरवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील या आदेशाचा भंग करुन आठवडा बाजार चुकीच्या पद्धतीने देऊळवाड्यात रस्त्यावर भरवला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरपालिकेत चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी मालवण तहसीलदार यांना देखील निवेदन सादर करुन आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
दरम्यान, नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरपालिकेच्या भाजी मार्केटचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर सर्वच फिरत्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी बसवून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. मात्र युवा व्यापाऱ्यांनी आणखी किती वेळ वाट पाहायची? पुढील सोमवारपासून आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेतच भरवण्यात यावा अशी आग्रही मागणी केली. नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेविका मेघा गावकर यांनी देखील आठवडा बाजार सागरी महामार्गावर भरत असल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले. तर येथील वाळके यांनी देखील नगरपालिकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आज युवा व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यास मालवणातही जनरेशन झेडचे परिणाम दिसून येतील असा इशारा दिला. मुख्याधिकारी प्रतीक पुरात यांनी हा विषय संपूर्ण शहराशी निगडित असल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा ठेवून कोणाचीही गैरसोय होणार नाही असा सर्व समावेशक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी बोलआरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.






Subscribe to my channel






