नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच !
दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानेही झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात आली होती. याची सुनावणी गुरुवारी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही हा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आमदार नितेश राणे यांना १० दिवसात जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र येथेही हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयात आमदार राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी गुरुवारी घेण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसात त्यांनी जिल्हा न्यायालयात हजर राहून अटकेची व जामीनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र तोपर्यंत आमदार नितेश राणे यांना अटक करू नये, अशी अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.