मतदान कार्ड आधारला लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध !
खा. विनायक राऊत यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या मतदारांच्या दृष्टीने ह्या विधायकावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असताना तशी चर्चा न झाल्याने या विधेयकाला शिवसेनेचा विरोध असल्याचे खा. राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल राज्यसभेत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा संताप, उद्रेक स्वाभाविक आहे, असं ते म्हणाले. भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून त्रास दिला जातोय असंही सांगून सिंधुदुर्गात चारही नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडी यशस्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील गटबाजीत उद्धव ठाकरे लक्ष घालतील असंही ते म्हणाले.