
झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत पालकमंत्र्यांचा सहभाग; ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानालाही सुरुवात
सिंधुदुर्ग, दि. १६ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी, घरगुती सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती आणि त्याचवेळी ग्रामस्थांसोबत शेताच्या बांधावर नाचणीची भाकरी अन् भाजीचा आस्वाद घेत साधलेला संवाद… अशा अनौपचारिक वातावरणात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर-आंबेली येथे जलसंधारणाच्या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या प्रत्यक्ष श्रमदानामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या प्रयत्नांना चालना मिळाली.
दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि भूजलसाठा वाढविणे आवश्यक आहे. यासाठी केवळ प्रशासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. हीच भूमिका ठेवून झरेबांबर-आंबेली येथील ग्रामस्थांनी वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामात प्रत्यक्ष श्रमदान केले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थही या उपक्रमात सहभागी झाले.
‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानाला सुरुवात
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानांतर्गत शोषखड्डा निर्मितीच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. घरगुती वापरानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, पाण्याचे जमिनीत पुनर्भरण होण्यास मदत करणे आणि परिसरातील स्वच्छता राखणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वनराई बंधारे आणि शोषखड्डे अशा उपाययोजनांच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.
महिला बचत गटांच्या पुढाकाराचे कौतुक
वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्यांचे आणि ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून केलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम केल्यास जलसंधारणाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप देता येऊ शकते.
शेताच्या बांधावर रंगल्या गप्पा; नाचणीच्या भाकरीचा आस्वाद
या दौऱ्यातील विशेष प्रसंग ठरला तो पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत शेतात बसून घेतलेला भोजनाचा आस्वाद. वनराई बंधाऱ्याच्या कामानंतर नितेश राणे यांनी ग्रामस्थांसोबत नाचणीची भाकरी आणि भाजी खाल्ली. शेताच्या बांधावर बसून झालेल्या गप्पांमधून त्यांनी ग्रामस्थांशी अनौपचारिक संवाद साधला. जलसंधारणाच्या कामाबरोबरच ग्रामीण जीवनातील साधेपणा अनुभवण्याची संधीही या निमित्ताने मिळाली.
यावेळी सभापती पर्वती गवस, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, रामा गवस, श्रेया धरणे, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच शाम नाईक, ग्रामविकास अधिकारी कृष्णा देसाई, पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत, गावचे मानकरी केशव गवस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.







Subscribe to my channel






