निलेश राणेंचे आदित्य ठाकरे, वैभव नाईकांवरील आरोप अज्ञानीपणातून : हरी खोबरेकर

आरोप करण्यापूर्वी सीआरझेड परवानगीची प्रक्रिया जाणून घेणे होते आवश्यक

मंजुरी नसलेल्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन करून देवबाग ग्रामस्थांची केली फसवणूक

कुणाल मांजरेकर

मालवण : माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग बंधाऱ्याच्या परवानगी वरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार वैभव नाईकांवर टीका करण्यापूर्वी सीआरझेडची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक होते. खासदार निधीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाली, म्हणून काम सुरू करण्यासाठी ते रस्त्याचे काम नाही. बंधारा उभारणीसाठी कांदळवन विभाग, पर्यावरण विभाग, सीएमझेडची परवानगी आवश्यक असते. त्यानंतर त्या कामाची निविदा होऊन वर्कऑर्डर बाहेर पडते. अन् तद्नंतरच बंधाऱ्यांचे काम सुरू होते. देवबाग बंधाऱ्याची फाईल अद्याप सीएमझेड कडेच गेलेली नाही. त्यामुळे आ. वैभव नाईक यांनी सांगितल्या वरून आदित्य ठाकरेंनी देवबाग बंधाऱ्याच्या मंजुरीची फाईल अडवली, हा निलेश राणेंचा आरोप केवळ हास्यास्पदच नव्हे तर त्यांचे अज्ञान दाखवणारा आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी नसलेल्या बंधाऱ्याच्या भूमीपूजनाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आणून निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राणेंचा कमीपणा दाखवण्या बरोबरच तळाशील वासियां प्रमाणेच देवबाग ग्रामस्थांचीही दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

देवबाग गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून होत असलेल्या बंधाऱ्याला पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. आमदार वैभव नाईक यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून हर काम रोखण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा नेते निलेश राणे यांनी केला होता. या आरोपाचा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, मोहन मराळ, दत्ता पोईपकर, नरेश हुले, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात निलेश राणे यांनी काय केले आणि आता केंद्राच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा निधी सिंधुदुर्गात आणला, हे सांगण्यापेक्षा ते वारंवार शिवसेनेच्या आमदार, खासदारांवर टीका करण्याचे काम करीत आहेत. बंधारा उभारण्यासाठी केवळ निधी मंजुरीचे पत्र देऊन काम होत नाही. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतलेल्या बंधाऱ्याच्या भूमीपूजनाला केंद्रीयमंत्री असलेल्या नारायण राणे यांना आणून त्यांचा कमीपणा दाखवण्याचे काम निलेश राणे आणि त्यांच्या सभोवतालच्या मंडळींनी केले आहे. बंधारा बांधण्यासाठी कांदळवन, पर्यावरण विभाग, सीएमझेड यांच्या परवानग्या घेतल्यानंतर निविदा प्रक्रिया होते. त्यानंतर कामाची वर्क ऑर्डर काढली जाते. मात्र यापैकी काहीही पूर्तता न करता हिसाडघाईने देवबाग बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. निलेश राणे यांनी ज्याप्रमाणे मागील वर्षी तळाशिल ग्रामस्थांना बंधाऱ्यासाठी १० दिवसात १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली, त्याच पद्धतीने केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे मंजुरीचे पत्र दाखवून देऊन देवबागवासियांची दिशाभूल करण्याचे काम करत स्वतःचे खापर आमदार वैभव नाईक यांच्या नावे फोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. या कृतीतून आपण कसे अज्ञानी खासदार कसे होतो, हे त्यांनी देवबाग वासियांना दाखवून दिल्याचे हरी खोबरेकर म्हणाले. विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही. निलेश राणे यांनी यापेक्षाही मोठ्या निधीची पत्रे आणून विकास कामांवर अधिक खर्च करावा, त्यासाठी आ. वैभव नाईक यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी देखील त्यांच्या सोबत आहे. पण खोटे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम करू नये, असे श्री. खोबरेकर म्हणाले.

तौक्ते वादळाच्या वेळी आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांवर टीका करणे सोपे होते. पण त्यावेळी आपण दिलेल्या आश्वासनां पैकी किती आश्वासनांची पूर्तता झाली, याचे आत्मपरीक्षण निलेश राणे यांनी करावे. येणाऱ्या काळात आमदार खासदारांवर टीका करताना अगोदर अभ्यास करूया, नाहीतर “नाचता येईना अंगण वाकडे” अशी आपली परिस्थिती होईल. सीएमझेड कडे विविध ठिकाणचे १२ बंधारे मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. मात्र यामध्ये नारायण राणे यांच्या निधीतून होणाऱ्या बंधाऱ्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे प्रकरण आदित्य ठाकरे पर्यंत अद्याप गेलेलेही नाही. आमदार वैभव नाईक सातत्याने येथील जनतेत मिसळून काम करत आहेत. त्यांचे काम येथील सर्वसामान्य जनता स्वतःच्या नजरेने पाहत असल्याने त्यासाठी निलेश राणे यांच्या दाखल्याची आवश्यकता नाही. देवबाग गावात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून खाडीकिनारी ७ कोटींचा बंधारा मंजूर झाला आहे. मात्र अद्याप या बंधाऱ्याला आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन कामाची वर्कऑर्डर निघाल्या नंतरच या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात येईल, असे हरी खोबरेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!