सर्व विकासकामे दर्जेदार व्हावीत – सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना ; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, मेघा गावकर उपस्थित



मालवण : मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर करण्यात आलेले रस्ता काँक्रिटिकरण काम निकृष्ट झाले आहे. या बाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर व नगरसेविका मेघा सावंत यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्व ठिकाणीकाँक्रिट उखडले असून धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काँक्रिटिकरण करण्याचे आदेश बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रशासनास दिले आहेत.
निवडणूक पूर्वी हे काम करण्यात आले. अवघ्या काही महिन्यात येथील काँक्रिट उखडले. या मार्गावरून वाहने गेल्यानंतर पुर्ण सिमेंट माती उडून धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्राप्त तक्रारीनुसार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक महेश कांदळगावकर, पालिका अभियंता राजा केरिपाळे आदी उपस्थित होते.
लाखो रुपये खर्च करून केलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर अशा कामांचा उपयोग काय? कामे होत असताना प्रशासनाने या कामांवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकृष्ट कामे होत असतील तर जनतेला सुविधा मिळणार कशा? अश्या स्वरूपात स्पष्ट नाराजी व्यक्त करत या संबंधित कामाच्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढून योग्य पद्धतीने काम पूर्ण करून घ्यावे. असे आदेश बांधकाम सभापती सहदेव बार्डेकर यांनी दिले आहेत. शहरातील सर्व कामांची पाहणी केली जाईल. काम दर्जेदार असले पाहिजे. निकृष्ट कामे आढळल्यास अशा ठेकेदारांना काळा यादीत टाकण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. जनतेच्या पैशातून जनतेसाठी होणारी कामे ही दर्जेदारच असली पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्रशासनाला पुढील कार्यवाही तात्काळ करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

Subscribe to my channel




