शिवराय सेक्युलर नव्हे, कट्टर हिंदुत्ववादीच!

कुडाळमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचे परखड प्रतिपादन; हिंदू एकजुटीचे आवाहन

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, तर हिंदुत्ववादी होते. महाराजांचा खरा इतिहास प्रत्येक हिंदूने वाचला पाहिजे. हिंदू समाजाने एकजूट आणि जागृत राहण्याची आज गरज आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हिंदूमय झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केले.

स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिवशंभू विचार मंच, शिवप्रेमी संघटना कोकण प्रांत सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि स्वराज्य सक्षमीकरण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी राष्ट्रीय संयोजक सुधीर थोरात, भूषण साटम, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, रमा नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी प्रत्येकाने तो वाचणे आवश्यक आहे. महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जातो; मात्र महाराजांच्या कार्याचा आणि तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. मुघलांकडून हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात महाराजांनी संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली, असे त्यांनी नमूद केले.

महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते का, याबाबतही विविध ऐतिहासिक संदर्भ आणि पुस्तके उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी या विषयाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. देशात सुरू असलेल्या इस्लामीकरणाच्या अजेंड्याला छेद देण्यासाठी हिंदूंनी जागृत राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा. या पुस्तकातून मुघल सल्तनतीचा इतिहास आणि तत्कालीन परिस्थितीची माहिती मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून हिंदू समाजाने संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!