कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शनिवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे वर्दे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सहा पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

दामिनी पालव ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान ती कडावल येथील बसस्थानकावर उतरली आणि आपल्या वर्दे येथील घराच्या दिशेने पायी निघाली. मात्र, घराकडे जाणाऱ्या वाटेतच तिच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी; सहा पथकांकडून शोधमोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. फरार आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची सहा पथके विविध दिशांनी तपास करत असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

हत्येमागचे कारण काय? तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष

दामिनीच्या हत्येमागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आणि या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपीला तातडीने अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वर्दे येथील या घटनेने परिसरात खळबळ उडवली असून, फरार आरोपीला पोलिस कधी जेरबंद करतात आणि तपासातून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!