अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे ९ ते ११ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गातील विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित ; १० फेब्रुवारीला आंगणेवाडी यात्रोत्सवास विशेष उपस्थिती

मालवण : कुणाल मांजरेकर

देश विदेशातील लाखो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे ९ ते ११ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते हडपीड मठाचे स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर व सहकाऱ्यांच्या नियोजनातून हडपीड स्वामी मठ व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होणार असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला १० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात महेश इंगळे हे आपल्या मित्रपरिवारासह दि. ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्राना भेट देतील. या दौऱ्यात अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील नित्य दिनक्रम, पूजा अर्चा व वटवृक्ष मंदीरात वर्षभरात साजरे होणारे उत्सव, महोत्सव, सण यांची विशेष माहिती देणार आहेत. तसेच वर्षभरात वटवृक्ष देवस्थानमध्ये राज्यभरातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी विशेष स्वामी दर्शन व्यवस्थेसह, पारायणकर्ते, हरीनाम सप्ताह, वर्षभरात सेवा देणारी राज्यभरातील भजनी मंडळे, किर्तनकार, भारूडकार, आध्यात्मिक क्षेत्रातील कलाकार इत्यादींसाठी देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात साऊंड सिस्टीमसह व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्यासाठी निवास व भोजन प्रसादाची करीत असलेल्या व्यवस्थेबाबत, देवस्थान संचलीत श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या माध्यमातून देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणारे अनेक आरोग्य विषयी उपक्रम, कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या व श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदीर माध्यमातून राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, वस्तीगृह निवास व्यवस्था, गोशाळा, अक्कलकोट मध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था, अक्कलकोट शहरातील महापुरूष, संत महात्म्यांचे साजरे होणारे जयंती, पुण्यतिथी महोत्सवास व सामुदायिक विवाह सोहळ्यांना देवस्थान समितीच्या वतीने धान्य स्वरूपातून मदत इत्यादी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा विषयक उपक्रमांबाबतही विशेष माहिती देणार आहेत.

कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे – सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देवगड तालुक्यातील हडपीड मठात स्वागत, सकाळी ९ ते १० अल्पोपहार, सकाळी ११-३० वा. हडपीड मठातून कणकवली श्री भालचंद्र महाराज मठाकडे रवाना, दुपारी १२ ते १ पर्यंत दर्शन, महाप्रसाद, दुपारी २ वाजता पिंगुळी कुडाळ- सदगुरु राऊळ महाराज मठ, सायंकाळी ५:३० वाजता टेंबेस्वामी महाराज मठ, माणगांव दर्शन आणि रात्री महाप्रसाद होईल. मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ मठ, मिठ मुंबरी येथे सकाळी १० वाजता – कुणकेश्वर मंदिर, दुपारी : ११ वाजता – रामेश्वर मंदिर आचरा, दुपारी : १२ वाजता वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन महाप्रसाद, दुपारी ३ वाजता आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सव उपस्थिती आणि दर्शन. दि. ११ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड पूर्ण वेळ मठात विविध कार्यक्रम संपन्न होतील अशी माहिती हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी देऊन जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअरमन व नगरसेवक तथा दैवी व्यक्तीमत्व असलेले महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा व अनमोल विचारांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!