पालकमंत्री नितेश राणेंची मोठी संकल्पना ; आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटॅनिकल गार्डन

अडीच एकरांत साकारणाऱ्या वनस्पती उद्यानात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन; विद्यार्थी, पर्यटक व अभ्यासकांसाठी ठरणार महत्त्वाचे केंद्र

वैभववाडी : तळकोकणातील जैवविविधतेचे जतन, दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि त्यांचा अभ्यास याला चालना देण्यासाठी आचिर्णे येथे तब्बल एक कोटी रुपये खर्चाचे बोटॅनिकल गार्डन (वनस्पती उद्यान) साकारण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून हा प्रकल्प मंजूर झाला असून, सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आचिर्णे येथे सुमारे अडीच एकर क्षेत्रात हे वनस्पती उद्यान उभारण्यात येणार आहे. तळकोकणात आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पती, त्यांचे औषधी महत्त्व, उपयोग आणि संवर्धनाची माहिती या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांना मिळणार आहे. उद्यानात दुर्मिळ व उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यासोबतच पर्यटक, अभ्यासक आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मानवी आरोग्यासाठी उपयुक्त वनस्पतींची ओळख करून देणे, त्यांचे संवर्धन करणे आणि जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. तळकोकणातील वनस्पती संपदेचा अभ्यास करण्यासाठी संशोधक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठीही हे उद्यान महत्त्वाचे अभ्यासकेंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पामुळे वैभववाडीच्या पर्यटन, पर्यावरण आणि शैक्षणिक विकासाला नवी चालना मिळणार असून, तालुक्याच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. वैभववाडी तालुक्यात अशा अभिनव प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या बोटॅनिकल गार्डनचे भूमिपूजन लवकरच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

error: Content is protected !!