भोसले सैनिक स्कूलमध्ये १०५ विद्यार्थ्यांसोबत शरद वझेंचा बुद्धिबळाचा अनोखा डाव

‘सायमल्टेनिअस चेस प्ले’मधून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना; एकाच वेळी अनेक पटांवर रंगले बुद्धिबळाचे सामने

सावंतवाडी : बुद्धिबळाच्या खेळाचा प्रसार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून ‘सायमल्टेनिअस चेस प्ले’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल १०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत बुद्धिबळाचा डाव खेळण्याचा अनुभव घेतला.

एकाच वेळी अनेक खेळाडूंविरुद्ध एकट्याने बुद्धिबळ खेळण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारासाठी शरद वझे विशेष ओळखले जातात. त्यांनी दिवसभरात सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत विविध बॅचेसमध्ये सलग सामने खेळले. एका पटावरील चाल समजून घेत असतानाच दुसऱ्या पटाकडे वळत प्रत्येक डावाचे बारकाईने निरीक्षण करण्याचे त्यांचे कौशल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चाली, डावपेच, विचार करण्याची पद्धत आणि निर्णयक्षमता यांचे वझे यांनी बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या वेगवान आणि अचूक खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ बुद्धिबळ खेळण्याची संधीच मिळाली नाही, तर अनुभवी बुद्धिबळपटूसोबत प्रत्यक्ष खेळातून शिकण्याची संधीही मिळाली.

विश्वनाथ आनंद यांनी २००७ मध्ये बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळाच्या प्रसारासाठी शरद वझे यांनी १ मे २००८ पासून ‘बुद्धिबळ प्रज्ञा शोध’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी आतापर्यंत नऊ राज्यांतील दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसोबत सायमल्टेनिअस बुद्धिबळ सामने खेळले आहेत. तसेच सलग १३ तास बुद्धिबळ खेळण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना तीन विद्यार्थ्यांना ‘सी’ ही उत्कृष्ट श्रेणी, तर इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळाच्या कामगिरीनुसार ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या चाली, डावपेच, विचार करण्याची पद्धत आणि निर्णयक्षमता या विविध बाबींच्या आधारे हे मूल्यमापन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, भोसले सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन क्रेसिडा डिसोझा यांनी केले, तर श्वेता खानोलकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!