
मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून चाकरमान्यांना मोठा दिलासा; दादरहून विशेष रेल्वेला हिरवा झेंडा
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला आणखी एक दिलासा मिळाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांसाठी दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ आज कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवत विशेष रेल्वेला मार्गस्थ केले.
यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणासाठी रवाना झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता या विशेष रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि उपनगरातून गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळत आहे. गेली १४ वर्षे सातत्याने गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेसेवेचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे आरक्षणासाठी होणारी धावपळ, तिकिटांची वाढती मागणी आणि खासगी वाहनांच्या वाढत्या भाड्याचा ताण या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वेचा पर्याय चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
मोफत प्रवासाची सुविधा आणि आरक्षित आसनव्यवस्थेमुळे गणेशभक्तांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गावी जाण्याची आतुरता असलेल्या चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष रेल्वेला रवाना करताना दादर रेल्वे स्थानकाचा परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या जयघोषानेही परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सलग १४ वर्षे गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेसेवेचा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित गणेशभक्त चाकरमान्यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत कोकणाच्या दिशेने निघालेल्या प्रत्येक चाकरमान्याचा प्रवास सुखरूप, सुरक्षित आणि मंगलमय होवो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!






Subscribe to my channel






