पाणीटंचाईच्या संकटात कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक नको : आमदार निलेश राणेंच्या सक्त सूचना

१५४ बंधाऱ्यांपैकी केवळ ३६ बंधाऱ्यांत योग्य पाणी अडवणूक; लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी

मालवण : जिल्ह्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करू नका. सरसकट पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत पोहोचवा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि चुकीचा कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिला.

समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाणीटंचाईवरील उपाययोजना, बंधाऱ्यांची सद्यस्थिती, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विभागाने सादर केलेली दुरुस्तीची अंदाजपत्रके चुकीची आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागाच्या माहितीनुसार १५४ बंधाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ ३६ बंधाऱ्यांमध्येच योग्य पद्धतीने पाणी अडवले गेले आहे. तसेच २ कोटी ६४ लाख रुपयांचा दर्शवलेला खर्च आणि बंधाऱ्यांची प्रत्यक्ष स्थिती याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सुमारे ७५ टक्के बंधारे निकामी किंवा अयोग्य स्थितीत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला. बंधाऱ्यांची पाहणी केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष पाहणीवेळी आवश्यक उपस्थितीही दिसून आली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जानेवारीपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जानेवारी महिन्यापासून नागरिकांना टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी टँकरचे नियोजन आणि आराखडा आताच अंतिम करण्याचे निर्देश आमदार राणे यांनी दिले.

तालुक्यात सुमारे ३५ टक्के वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असली, तरी ज्या भागांत पाण्याची प्रत्यक्ष गरज आहे, तेथे प्राधान्याने कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदारांनी ग्रामसेवकांना कडक सूचना देऊन शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, याची दक्षता घेण्यासही सांगितले.

विहिरी, नळयोजना आणि कृषीविषयक प्रश्न आताच मांडा

बैठकीत उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राणे यांनी गावातील आणि वाड्यांमधील पाणीटंचाईचे प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. “आज सर्व विभागांचे अधिकारी समोर आहेत. निधीची तरतूद आजच्या बैठकीच्या आधारावर केली जाईल. नंतर प्रस्ताव दिल्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आपल्या भागातील विहिरी, नळयोजना आणि कृषी विभागाशी संबंधित अडचणी आताच नोंदवा,” असे त्यांनी सांगितले.

मालवणमधील शेतकरी आणि मच्छीमार स्वाभिमानी असून संकटाच्या काळात तालुक्याला सरसकट मदत मिळालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांच्या अडचणी सोडवताना मानवी दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

७ कोटी ४९ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा

बैठकीत मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा सादर करण्यात आला. आठ गावे आणि ४३४ वाड्यांसाठी एकूण ७ कोटी ४९ लाख ५ हजार रुपयांचा कृती आराखडा मांडण्यात आला. यामध्ये काही नवीन कामांचाही समावेश करण्यात आला.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!