निलेश राणेंची मध्यस्थी ; पं. स. मधील गटातटाच्या वादाला “पूर्णविराम” !

सुनील घाडीगांवकर आमचे गटनेते ; आमच्यातील गैरसमज दूर

सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर यांची प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीमध्ये भाजपाच्या दोन गटांत निर्माण झालेल्या वादावर माजी खासदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला आहे. निलेश राणेंनी पंचायत समिती मधील पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्यानंतर सभापती, उपसभापतीनी एक प्रसिद्ध करत सुनील घाडीगांवकर हे आमचे गटनेते असून आमच्यातील गैरसमज पूर्णतः दूर झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मालवण पंचायत समितीमध्ये सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर विरुद्ध गटनेते सुनील घाडीगावकर यांच्यात मागील आठवड्यात गटातटाचे राजकारण उफाळून आले होते. यामध्ये दोन्ही बाजूंकडील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केल्याने हे वाद अधिक भडकण्याची चिन्हे निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी या तिन्ही पदाधिकार्‍यांशी संवाद साधून त्यांच्यात समेट घडवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आमच्यातील वाद मिटल्याचे जाहीर केले आहे. आमच्या अंतर्गत विषयात उठाठेव करण्यापेक्षा विरोधकांनी स्वतःच्या घराची काळजी घ्यावी, असे सभापती- उपसभापतींनी म्हटले आहे. “गेल्या पंचायत समिती सभेवरून काही वाद विवाद आहेत असे वाटत असतील तर तसे काहीही नाही. सुनिल घाडीगावकर हे आमचे गट नेते आहेत. ते सभागृहात नेहमी विरोधकांवरच टिकाटिप्पणी करतात. काही किरकोळ गोष्टी असु शकतात, पण ते नेहमी आक्रमक विषयावर चर्चा करत असतात. ते आमचे गटनेते आहेत. माजी खासदार निलेशजी राणे यांच्याशी आम्ही चर्चा करून आमच्यातील काही समज गैरसमज होते ते पूर्ण दूर झाले आहेत. भविष्यात सभापती, उपसभापती आणि गटानेत्यांच्या चर्चेतून सर्वसामान्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील आणि तसा शब्दच आम्ही तिघांनी निलेशजी राणे यांना दिला आहे. तालुका अध्यक्षाच्या नेतृत्वात संघटना अधिक मजबूत करून आम्ही तिघेजण निलेश राणे यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार, हे निश्चित असून विऱोधकांनी सबुरीनेच घ्यावे” असे या पत्रकात अजिंक्य पाताडे व राजु परुळेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!